प्राक्तन
विश्वाच्या या प्रचंड अव्यक्त, अनाकलनीय व्यापात सजीव जीव स्वतःला स्वयंपूर्ण समजत असतो पण तो विधात्याच्या अदृश्य हातातील कळसूत्री बाहुला असतो. त्याला वाटतं, आपणच सर्व कर्माचा कर्ता आहोत. पण नियती तिचा खेळ ठरल्यानुसार खेळत असते. तसंच काहीस दिपकच्या बाबतीत घडले. मिरजे पासून गावाबाहेर एक किलोमीटरवर गावाला लागूनच बापू चे कॉलेज होते. पहिल्या वर्षात ऍडमिशन घेतल्यावर दररोज बापू चालतच कॉलेजला जायचा. जवळ जवळ अर्धा तास लागायचा. वेळ व्हायचा म्हणून नवीन सायकल घ्यायचे ठरवले होते. पण तोपर्यंत सकाळी लवकर उठून चालत जावे लागायचे. कॉलेज सुरू होऊन आठ दिवस झाल्यावर जाण्याच्या वाटेवरच एका लहानशा कौलारू घरातून एक जण दररोज आपल्याच वेळेत निघतो आणि कॉलेजला येतो हे त्याच्या लक्षात आले. एके दिवशी तो मुलगा त्याच्या पुढे चालला होता, याने थोडे वेगाने जाऊन त्याला गाठले आणि विचारले "तुम्ही मिरज कॉलेजमध्ये आहात?"" होय"" कोणत्या वर्गात"" पी. डी. कॉमर्स" "अरे! मग आपण एकाच क्लास मध्ये आहोत. " असे बोलत बोलत एकमेकांची ओळख झाली आणि दोघेही एकत्रच कॉलेजला जाऊ लागले. दीपक मांगवतीकर त्याचे नाव. तो त्याच्या बद्दल जास्त माहिती द्यायला उत्सुक नव्हता. थोडे दिवस गेल्यावर जवळ जवळ रोजच बापूची आणि त्याची भेट व्हायला लागली. हळू हळू दोघांची चांगलीच मैत्री झाली. दीपकच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती. वडील, आई, एक मोठा भाऊ, एक बहीण. वडील सायकल वरून आसपासच्या खेडेगावात जाऊन गोळ्या बिस्किटे विकायचे, दुकानदारांना होलसेल मध्ये माल द्यायचे. मोठा भाऊ एका कॉन्ट्रॅक्टटरकडे कामाला होता. हा अकरावीला चांगल्या मार्कात पहिल्या प्रयत्नात पास झाला, त्यामुळे त्याला कॉलेजला पुढील शिक्षणासाठी जायला मिळाले. दीपक चे वडील एके दिवशी सायकलवरून जात असताना मागून एका कार वाल्यानी धडक दिली. ते डोक्यावर पडले त्यांच्या मेंदूला मार लागला. त्यातून ते बरे झाले पण पुढे सायकल चालवू शकत नव्हते.त्यामुळे त्यांचा व्यवसाय बंद पडला. मग घर चालवण्यासाठी घरातच पुट्ठे आणून त्याची खोकी करणे, कागदी पिशव्या करणे इत्यादी घरबसल्या व्यवसाय चालू केला. भावाची कमाई आणि या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशावर कसेतरी घर चालायचे. दीपकला कॉलेजला जाणार म्हटल्यावर नवीन ड्रेस शिवला होता.तो ड्रेस आणि कधी जुने कपडे घालून तो कॉलेजला यायचा. कधी कधी तर रात्री कपडे धुऊन ठेवायचा आणि सकाळी पितळी तांब्यात चुलीतील विस्तव घालून त्यानी इस्त्री करून तेच कपडे घालून यायचा. बापूची परिस्थिती तशी काही खूप चांगली होती असं नव्हतं. मध्यमवर्गीय कुटुंब होतं. दीपक परिस्थिती मुळे म्हणा किंवा स्वभाव म्हणा जास्त काही बोलायचा नाही. कॉलेजमध्ये शांत बसलेला असायचा. त्याच्या उलट बापूचे होते सगळ्यांशी मैत्री करायची, दंगामस्ती करायची, कॉलेज लाइफ एन्जॉय करायचे. वेगवेगळे स्वभाव असूनही त्या दोघांची चांगलीच मैत्री झाली होती. दीपकचे एक वैशिष्ट्य होते तो खूप स्वाभिमानी होता. कॉलेजजवळच चहाची टपरी होती. तिथला वडा वहिनीचा वडा म्हणून प्रसिद्ध होता. त्यावेळी वहिनीचा वडा खाणे एक चैनीची गोष्ट होती. पैज लागली की, पार्टी द्यायची असली की, वडा आणि चहावर पार्टी व्हायची. चार मित्र जमले की कोणालातरी उठवून बसवून त्याच्याकडून वडा काढायचा हे ठरलेले असायचे. असाच मित्रांचा ग्रुप जमला वडा खायचे ठरले की, दीपक कोणाच्या लक्षात न येता हळुच सटकायचा. पहिल्यांदा कोणालाच काही वाटले नाही, पण बापूच्या लक्षात ती बाब आली. एके दिवशी कॉलेज सुटल्यावर नेहमीप्रमाणे दोघे घराकडे जाताना बापूने त्याला विचारले. " कॅन्टीनकडे जातानाच तु कसा काय गायब होतोस? आम्ही काय तुला पैसे द्यायला सांगतो की काय? " दिपक म्हणाला" नाही, पण तुम्ही चार वेळा दिल्यानंतर मला एकदा तरी द्यायला पाहिजे,आणि ते मला परवडणार नाही. आणि तू पण मला आग्रह करू नकोस, माझ्या मनाला ते पटत नाही. यानंतर बापूने कधीच त्याला आग्रह केला नाही. कॉलेजचे दिवस भराभर संपले. एखादं सुंदर स्वप्न सुरु व्हाव आणि पटकन संपून जावं अशी चार वर्षे कशी गेली, ते समजलंच नाही. दंगा-मस्ती, गॅदरिंग, परीक्षा, परीक्षेचे टेन्शन, निकाल. यातच ही चार वर्षे संपली. या चार वर्षात बापूची आणि दीपकची मैत्री मात्र तशीच राहिली. दोघे जिवलग मित्र झाले. आता तर दीपक त्यांच्या गल्लीतच राहायला आला होता. त्यामुळे दररोज संध्याकाळी तो बापू कडे यायचा, दोघे मिळून गावात, मार्केट मध्ये फिरायला जायचे. बापूने एका सी.ए. कडे कोर्ससाठी जाणे चालू केले. दिपकला घरच्या परिस्थितीमुळे नोकरी करणे भाग होते. तो गावातच एका औषधाच्या कारखान्यात क्लार्क म्हणून कामाला लागला. दोघांची आता रविवारीच भेट व्हायची. अचानक दीपकचे भाग्य म्हणा किंवा प्राक्तन, युनिव्हर्सल वेस्टर्न बँकेची जाहिरात आली. बँक शेड्युल्ड होती, मोठी होती. हेड ऑफिस मिरजेतच होते. मिरजेच्या माजी संस्थानिकांनी स्थापन केलेली बँक होती. योग जुळून आला. लेखी परीक्षेत चांगले मार्क पडले. इंटरव्यू चांगला झाला. संचालक मंडळात दीपक ज्या कारखान्यात कामाला होता, त्या कारखान्याच्या मालकाचे मित्रच होते आणि दिपक बँकेत लागला. चांगली नोकरी मिळाली, पगार चांगला होता. आता दीपकची परिस्थिती बदलली. घरात सुखाचे चार दिवस आले. भावाचे लग्न झाले. तो वेगळा राहायला लागला. मध्यंतरी त्याचे वडील वारले. आईचे पण वय झाले होते. दीपक लग्नासाठी मुली पाहायला लागला. नोकरी चांगली होती, बँकेतील होती. जवळच्या गावातील एका प्रतिष्ठित घरातील मुलगी सांगून आली. आणि थोड्या दिवसात लग्नही झाले. पहिली काही वर्षे आनंदात गेली. दीपकला मुलगा झाला. इकडे तो नोकरीत चांगला स्तिरस्थावर झाला होता. बापूचेही सी. ए. चे काही जमले नाही, त्यालाही इरिगेशनमध्ये नोकरी लागली. पोस्टिंग कोल्हापूरला होते. तो रोज येऊन जाऊन करत होता. आता बापू ची आणि दीपकची भेट अधून-मधून व्हायची. दीपक संसारात रममाण झाला होता. मध्यंतरी दिपकने फ्लॅट घेतल्याचे समजले. बरेच दिवस त्याची भेट नव्हती. एके दिवशी बापू कोल्हापूरहून आल्यावर जेवण करून निवांत बसला होता, रात्रीचे साडेनऊ दहा वाजले होते. दीपक आला आणि म्हणाला काय करतोयस चल जरा फिरून येऊ. बापू आणि तो दोघेही बाहेर पडले, दीपक चिंताक्रांत दिसत होता, बापू ने ओळखले, काहीतरी प्रॉब्लेम आहे. " काय झालं?"" तुला फ्लॅट घेतल्याचे समजले असेलच."" होय. मग!"" तो फ्लॅट मी आमच्या बँकेतील बॉसचाच, अग्निहोत्रीचा घेतला आहे. त्यांनी येथे मिरजेत प्लॉट विकत घेतला आहे. तेथे घर बांधणार आहेत. म्हणून त्यांनी त्यांचा फ्लॅट मला विकला. बँकेचे कर्ज प्रकरण त्यांनी करून दिले. त्यांचेही फ्लॅट वर कर्ज होते तेच माझ्या नावावर ट्रान्सफर केले. फ्लॅट माझ्या नावावर झाला आहे. इ. एम. आय. चालू झाला आहे." बापू म्हणाला "मग आता काय प्रॉब्लेम आहे?" साहेब अजून त्या फ्लॅटमध्ये राहतो आहे, तो फ्लॅट सोडायला तयार नाही. घर बांधायला काढणार आहे थोडे दिवस थांब असे म्हणतो आहे. काही भाडे पण देत नाही. साहेब असल्याने बोलताही येत नाही. इथल्या खोल्यांचे भाडे देतोच आहे पुन्हा आणि आता बँकेचा ई. एम. आय., घरच्या खर्चाचा मेळ बसेना झालेला आहे. अडचणीत आलो आहे, काय करावं काही सुचेना झाले आहे." बापू त्याच्यावर स्वभावानुसार भडकला" लेका तू प्रॉपर इथला आहेस, तुझा कुठला कोण साहेब तामिळनाडूहून आलेला, त्याला काय भीतोस? काय करणार आहे तो? सरळ घरी जा आणि त्याला दम दे, दोन दिवसात फ्लॅट सोडला नाहीस तर सामान रस्त्यावर फेकून देईन म्हणून सांग." दिपक म्हणाला" नाही नाही तो आमचा साहेब आहे. खूप खडूस आहे. माझ्या मागं काहीतरी भानगड लावेल." दीपक नोकरीला घाबरला होता. बापू म्हणाला " तू म्हणत असलास तर आम्ही चार-पाच मित्र जाऊन त्याला चांगल्या भाषेत समजावून सांगतो. सरळ ऐकला तर बरं नाहीतर दुसरा मार्ग आहेच." पण दीपक काही त्याला तयार झाला नाही. मग बापूने त्याला त्यांच्या वरच्या बॉसला भेटायचा सल्ला दिला. एके दिवशी दीपक आला, आता तो थोडा रिलॅक्स होता. म्हणाला" साहेबांनी फ्लॅट सोडला मी आता राहायला जातो आहे". बापू म्हणाला "कसं काय जमलं? "" काही नाही एके दिवशी सकाळी सहालाच साहेबाकडे फ्लॅटवर गेलो. अग्निहोत्री हॉलमध्ये बसला होता. कोण आलय हे बघायला अग्निहोत्रीची बायको आणि आई बाहेर आले. त्यांच्या समोरच मी त्यांना सांगितले की मी आर्थिक अडचणीत असून, आता मला ओढातान झेपत नाही. तुम्ही जर या महिनाअखेर फ्लॅट सोडला नाही तर मी याच दरवाज्यात विष पिऊन आत्महत्या करणार. अग्निहोत्रीची आई घाबरली, आम्ही दुसरी जागा बघतो. लगेचच फ्लॅट सोडतो असं म्हणायला लागली. मी काहीही न बोलता रागारागाने निघून आलो. आणि माझ्या बोलण्याचा परिणाम झाला, अग्निहोत्री ने दोन दिवसात फ्लॅट सोडला. दीपक आता खुशीत होता,पण प्रत्येकाचे नशीब त्याच्या त्याच्या बरोबर खेळ खेळत असते. कधी-कधी त्याच्याच मार्फत त्याच्या भविष्याचा वेध घेत असते, संसारचक्रात गुरफटलेल्या मानवाला त्याची चमत्कारिक चाल समजून येत नाही. महिनाअखेरला दीपक फ्लॅटमध्ये राहायला गेला. फ्लॅट गावाबाहेर नवीन वसाहतीत होता. त्यामुळे आता दोघांची भेट कधीतरीच व्हायची. दोघेही आपापल्या व्यापात व्यस्त झाले होते. दिपकला पुन्हा दोन जुळी मुले झाली. दीपक तीन मुलांच्या मध्ये गुंतून गेला होता. आठ-दहा महिने बापूची आणि त्याची भेट झाली नव्हती. एके दिवशी रेल्वे स्टेशन वरून घरी येताना वाटेत शिवप्पा पाटील त्याच्या रेडिओ दुरुस्तीच्या दुकानात बसला होता. त्याने बापूला पाहून हाक मारली. बापू कंटाळून आला होता तरीही त्याने बोलावलं म्हणून तो दुकानात गेल्यावर तो म्हणाला. " बापू, तुझा मित्र दीपक आजारी आहे. त्याला पॅरॅलिसिस झालाय. " बापूला धक्काच बसला. " काय सांगतोस? " शिवा म्हणाला" मला तरी असं समजलय. नक्की माहिती नाही. मला वाटलं तुला माहित असेल. ""नाही " हल्ली माझी आणि त्याची काही भेट नाही. बघू सुट्टीत जाऊन येतो." असे म्हणून तो घरी आला. पुढे आज जाऊ उद्या जाऊ करत जवळ जवळ महिना झाला बापूला काही वेळ मिळाला नाही. एकेदिवशी रविवारच्या सुट्टीत बापू दीपकच्या फ्लॅटवर गेला. दीपक हॉलमध्ये कोपऱ्यात बेडवर झोपून होता. त्याची डावी बाजू पूर्णपणे अधू झाली होती. आवाज जड झाला होता तो काय बोलतो हे नीट समजत नव्हते. पण डोळ्यातील आर्त भाव बरेच काही सांगून जात होते. तेवढ्यात त्याची बायको कडेवर एका मुलाला घेऊन हॉलमध्ये आली. अंगाने स्थूल , त्रासलेला चेहरा. पण त्यावर कोठेही वेदना दिसत नव्हती फक्त त्रागा होता. ती त्याला बोलूनच देत नव्हती. स्वतः बडबडत होती. स्वतःकडे लक्ष दिले नाही कायम बँक बँक करायचे, कामाशिवाय काही सुचत नव्हते, पैशाची ओढाताण होत होती, तीन पोरं पदरात मी तरी एकटी काय करणार. असं काहीतरी बडबडत होती. पण त्याच्या आजारपणाबद्दल काही बोलत नव्हती. तिच्या एकंदर वागण्या-बोलण्यात वरून तिला त्याच्याबद्दल जिव्हाळा असल्यासारखं वाटत नव्हतं. तसेच तिच्याकडे संसारातील समजूतदारपणा, सहनशीलता, परिस्थितीला तोंड देण्याची मानसिकता असल्यासारखे वाटत नव्हते. बापूला वाटले आपण कदाचित त्यांना जास्त ओळखत नाही म्हणून आपल्याला तसे वाटले असेल. ती तरी काय करणार तीन मुले, आजारी नवरा यांना सांभाळणे तसे जिकारीचेच होते. एके दिवशी मार्केटमध्ये जात असताना बापूच्या सायकल जवळच रिक्षा येऊन थांबली. पहातो तर त्यात दीपक बसला होता. बापूला बरे वाटले. "कसा आहेस? "" ठीक आहे" पण अजून चालता येत नाही, हळू हळू आधाराने चालतो. रोज बँकेत रिक्षाने जातो आणि रिक्षाने येतो." बापू म्हणाला "एवढा त्रास घेण्याऐवजी रजा काढायची. "" किती काढायची रजा सगळी संपली. आता विदाऊट पे मिळेल पण घर कसं चालायचं? पुन्हा फ्लॅट चा हप्ता, म्हणून कसातरी जातो." बापूने त्याला धीर दिला लवकर बरा होशील काही काळजी करु नकोस असे सांगितले. थोड्या दिवसांनी बापू कोल्हापूरला शिफ्ट झाला. जवळ जवळ पाच सहा महिने दीपक बद्दल काहीच माहिती समजली नव्हती. अचानक एके दिवशी बापूला ऑफिसमध्ये असताना शिवाप्पाचा फोन आला. तो म्हणाला" दिपक गेला" बापू ला धक्का बसला" कधी? "" चार दिवस झाले मला वाटले तुला समजले असेल. पण तू काही आलेला दिसला नाहीस. तुला काही समजले की नाही म्हणून फोन केला."" नाही, मला आत्ताच कळतय " बापू म्हणाला. बापू ती बातमी ऐकून एकदम सुन्न झाला. दोन दिवसांनी बापू दीपकच्या घरी गेला. घरात दिपक ची बायको, भाऊ बसले होते. त्याला काय बोलावे तेच सुचेना. त्याने विचारले "असे कसे झाले? " भावाने सांगितले त्याने आत्महत्या केली, इथेच हॉलमध्ये विष पिऊन, आजाराला खूप कंटाळला होता." बापू पुढे काहीच बोलला नाही. त्याच वेळी बापूचा कॉलेजचा मित्र केसकर आला. तो दीपक बरोबर बँकेत एकाच ब्रँचमध्ये कामाला होता. थोडा वेळ दोघेही थांबले. सांत्वनाचे चार शब्द बोलून दोघेही एकदमच बाहेर पडले. बापू म्हणाला" खूप वाईट झाले. " केसकर म्हणाला " खरं म्हणजे कर्जामुळेच तो आत आला. मागे काही आधार नाही. कर्जाचे हप्ते कसे फेडायचे, घर कसं चालवायचं, या काळजीमुळेच तो आजारी पडला. आणि शेवटी शेवटी तर त्याने हबकीच खाल्ली. आम्ही किती समजावून सांगत होतो, आधार देत होतो, पण तो काही त्यातून बाहेर पडू शकला नाही." बापू येता-येता स्वतःशीच विचार करत होता, लहानपणापासून गरिबीशी झुंजत आयुष्य गेले, आणि धडपडून यश मिळवले पण त्याचा शेवटही हा असा झाला. यालाच प्राक्तन म्हणायचे काय?.
====================== - ॲड.सुरेश जमखंडे - जयसिंगपूर - 9850057127 --------------------------------------------- सुरेश जी. जमखंडे, 29.इंदिरा हाऊसिंग सोसायटी,( पश्चिम) पोस्ट:-जयसिंगपूर. तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर. ---------------------------------------------
टिप्पण्या