प्रारब्ध
पुण्यातील रास्ता पेठ हायस्कूलच्या इमारतीच्या पुढील बाजूस असलेल्या व्यापारी संकुलाच्या एका गाळ्यात प्याराडाईज लायब्ररी होती. शशिकांत त्यावेळी दहावीत होता. त्याला वाचनाची आवड असल्याने लायब्ररीत जाऊन नवीन नवीन पुस्तके आणत असे. शाळेजवळच लायब्ररी त्यामुळे शाळा सुटल्यावर लायब्ररीमध्ये नेहमीच असायचा. एकेदिवशी लायब्ररीत पुस्तके पहात असताना शेजारी एक अठरा एकोणीस वर्षाचा तरुण उभा होता. तो म्हणाला गलिवर ट्रॅव्हल, ट्रेझर आयलँड ही पुस्तके आली आहेत, लहान मुलांची आहेत पण चांगली आहेत वाच. शशीने गलीवर ट्रॅव्हल घेतल आणि बाहेर पडला, नंतर त्याच्या लक्षात आले कि आपण त्याचे नाव विचारायचे विसरलो चार-पाच दिवसांनी पुन्हा एकदा शशी लायब्ररी मध्ये गेला होता. त्या वेळी तो मुलगा बाहेर पडत होता, त्याने शशीला हात केला, हसला आणि निघून गेला. अशीच दोघांची नेहमी भेट होत होती. मग हळू हळू ओळख झाली. त्याचे नाव अनिल धारणे तो फर्ग्युसनला पहिल्या वर्षात शिकत होता. त्यांचे स्टेशनजवळच ससूनच्या पुढच्या गल्लीत मेडिकलचे दुकान होते. दुकान मोठे होते. हॉस्पिटल जवळ असल्याने दुकानात कायम गर्दी असायची. राहायला रास्ता पेठेत स्वतःचे घर होते. दुकानात वडील असायचे. अनिलचा लहान भाऊ रास्ता पेठ हायस्कूलला सातवीत होता. एके दिवशी अनिल शशीला बाहेरच भेटला, चल चहा घेऊ म्हणाला. शशी नको म्हणाला. "का ?चहा घेत नाहीस" अनिलने विचारले. "नाही तसे काही नाही."" अरे चल." म्हणत त्याने त्याच्या खांद्यावर हात टाकला. दोघे जवळच्याच नरपतगिरी चौकातील हॉटेलमध्ये गेले. चहा घेता घेता अनिल निरनिराळ्या विषयावर गप्पा मारत होता. गप्पा म्हणजे तो बोलत होता आणि शशी ऐकत होता.हळूहळू हे दोघांचे रुटीनच झाले. चार-पाच दिवसांनी भेट व्हायची कधी चहा घ्यायचा, कधी लायब्ररी बाहेरच गप्पा मारत उभे राहायचे. यामध्ये शशीच्या एक गोष्ट लक्षात आली की, अनिल हे एक वेगळेच रसायन होते. त्याचे वाचन प्रचंड होते. प्रत्येक विषयातील त्याला चांगलीच माहिती होती, अगदी चालता बोलता एन्सायक्लोपीडियाच. शशीला त्याचे ज्ञान, माहिती यामुळे भविष्यात मोठेपणी हा खूप मोठा कोणीतरी होणार याची खात्री वाटत होती. अनिलची स्वप्नही खूप मोठी होती त्याला परदेशात जाऊन पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे होते. मोठा बिजनेस उभा करायचा होता. अनिलला इंग्रजी पुस्तकांची आणि इंग्रजी चित्रपटांची खूप आवड होती. शशीला पण पहिल्यापासून इंग्रजी चित्रपट पाहण्याची आवड होती. चार्ली, लॉरेल हार्डी, सेकंड वर्ल्ड वॉरवरील मुव्हीज त्याला आवडत होते. दोघांची आवड जवळ-जवळ सेम होती. एके दिवशी त्याने शशीला विचारले काय काय वाचल आहेस. स्वामी, मृत्युंजय, ययाती, ई. ई. अनिल म्हणाला छान, पण इंग्रजी पुस्तक सुद्धा वाचत जा. इंग्रजी साहित्य समृद्ध आहे. आणि प्रत्येक भाषेतील चांगल्या पुस्तकांचे भाषांतर इंग्रजी मध्ये झालेले आहे. रहस्य कथा वाचायच्या तर त्या चेस, अगाथा ख्रिस्ती यांच्या, ओ हेनरी, सिडने शेल्डन, रॅन्ड, ऑर्थर ह्याले, हेमिंग्वे ई. ई. त्याने ओळीने लेखकांची नावे घ्यायला सुरुवात केली. शशी म्हणाला अजून मला इंग्रजी वाचन जमत नाही. अनिल म्हणाला वाचत जा आपोआप सवय होईल. आणि शशीला त्याच्यामुळे इंग्रजी वाचण्याची गोडी लागली. अनिल तसा सधन होता. घरी ॲम्बेसिडर होती, तसेच वेस्पा स्कूटर होती. नुकताच तो कॉलेजला जायला लागला म्हणून वडिलांनी त्याला रॉयल एनफिल्ड घेऊन दिली होती. गळ्यात सोन्याची चेन अंगावर चांगले उंची कपडे असायचे. पण त्याच्या वागण्यामध्ये कोठेही श्रीमंतीचा गर्व नव्हता. तसा शशी आणि अनिल मध्ये चार-पाच वर्षाचा फरक होता. पण आवड सारखी असल्याने एक अदृश्य अशा धाग्याने दोघांच्या मैत्रीचे बंध बांधले गेले होते. अनिलला त्याच्या कॉलेजमधले मित्र होते पण आठवड्यातून एक-दोनदा शशीला भेटल्याशिवाय त्याला चैन पडत नसे. कधीकधी बोलत बोलत जवळच असलेल्या शाहू उद्यानात जाऊन गप्पा मारत बसायचे, जवळच्या गाडगे महाराज मठा मधील लायब्ररीचे आप्पा देसाई शशीच्या चांगल्या ओळखीचे होते. त्यांच्याकडे जाऊन जुनी पुस्तके धुंडाळायची, चांगलं पुस्तक मिळाल तर वाचायला घ्यायचं, त्याच्यावर चर्चा करायची. शशीला अनिलच्या वाचनाबद्दल प्रचंड आदर होता. शशी उद्यानासमोरच्या सोमवार पेठेतील एका वाड्यात राहायचा. एके दिवशी अनिलने त्याला त्याच्या घरी बोलावले. अनिलच्या घरावरून त्याची श्रीमंती लक्षात येत होती. लाकडी शिसवी फर्निचर, बेळगावहून खास मागवलेले मोठे मोठे दिवाण, खुर्च्या, लाकडी नक्षीकाम केलेले टेबल. त्याच्या शेजारी शिसवी टीपॉय, त्यावर लाकडात कोरलेला मोठा सिंहाचा स्टॅच्यू, उंची पडदे, टेबलावर विणलेला सुंदरसा टेबल क्लॉथ, नक्षीदार खुर्च्या, कोपऱ्यात मोठा लाकडी पलंग, त्यावर लोड, तक्के. शशी अंग चोरून बसला होता. तेवढ्यात अनिलची आई आली. अनिलने त्याची ओळख करून दिली. आईने शशीच्या घरच्यांची विचारपूस केली. आत जाऊन एका मोठ्या प्लेटमध्ये चिवडा, बर्फी घेऊन आली." घे लाजू नकोस, अनिल कायम तुझ्याबद्दल सांगत असतो." अनिलचीआई ही सावत्र आई होती, अनिल लहान असतानाच त्याची आई वारली होती. म्हणूनच बहुतेक वेळ अनिल घराबाहेरच रहायचा असं शशीला वाटलं, पण तशी अनिलची आई स्वभावाने चांगली वाटत होती. बाहेर पडताना" येत जा रे अधून मधून" म्हणाली. अनिलच्या घरचे वातावरण पाहून शशी मनातल्या मनात दबकला. अनिलला आपल्या चाळी मधल्या वीस बाय वीस च्या खोलीत कसे बोलवायचे? हा प्रश्न त्याला पडला. शशीने त्याला घरी बोलवायचेच नाही असा विचार केला, पण त्याचे मन रहावेना, एके दिवशी बोलता बोलता शशीने त्याला त्यांच्या घरा बद्दल सांगितले. अनिल मोठ्याने हसला आणि म्हणाला, "अरे, त्यात काय, तू उगीच काहीतरी डोक्यात घेतोस, तू काही तसला विचार करू नकोस. मी फक्त श्रीमंत मुलांची मैत्री करायचे ठरवले असते तर मला शक्य नव्हते का? कॉलेजमध्ये तसे मित्र भरपूर आहेत. पण तुला एक सांगू काय, कधी कधी आपल्या आयुष्यात एक विलक्षण योग असतो. एखादी व्यक्ती आपल्याला पहिल्या भेटीतच आवडते. असे वाटते की याच्याशी आपली विचारधारा जमेल, का हे फक्त ईश्वरी कल्पनेने निर्माण केलेल्या त्या अदृश्य शक्तीलाच ठाऊक. लोहचुंबका सारखे आपण एकमेकांकडे आकर्षित होतो. आणि नंतर आपली आणि त्याची मते एक सारखीच आहेत हे भेटीअंती समजते. हा निसर्गाचा अतर्क्य अनाकलनीय नियम समज किंवा काहीही पण हे असं बऱ्याचवेळा घडतं. त्याला लॉजिक लावून चालत नाही. दोघे जुळे भाऊ असले तरी, दोघांचे मित्र मात्र वेगवेगळे असतील, दोघांच्या आवडीनिवडी सारख्या असतीलच असेही नाही. यालाच त्या सर्वशक्तिमान अव्यक्त प्रेरणेने निर्माण केलेले मानवी मनाशी खेळण्याचे सूत्रही म्हणता येईल.तुझ्या माझ्या आवडी निवडी जमतात. पैसा, श्रीमंती हे काय कायमच असते काय?. उद्या तू मोठा झालास आणि चांगली नोकरी मिळाली किंवा चांगला उद्योग सुरू केलास, तर तुझ्याकडेही पैसा येईल. त्याचा आणि आपल्या मैत्रीचा काहीही संबंध नाही."अनिल असं बोलल्याने शशीच्या मनावरील दडपण बरेचसे कमी झाले. आणि पुढे दोघेही अगदी जिवश्च कंठश्च मित्र बनले. ते दोघेही एखाद्या रविवारी पिक्चरला जायचे. त्यावेळी अलका टॉकीजला इंग्रजी पिक्चर कायम असायचे. अनिलमुळे त्याला चांगले चांगले पिक्चर बघायला मिळाले. तो सिलेक्टेड पिक्चर शशीला सुचवायचा. चांगली पुस्तके सांगायचा. होमरचे 'इलियड' शेक्सपिअरचे ' ऑथेल्लो', हेमिंग्वेचे 'फॉर हुम बेल्स टॉल्स,ई. ई. बरीच पुस्तके. सिनेमा बाबतीत तर त्याच्याकडे मोठीच्या मोठी लिस्टच होती. 'लोंगेस्ट डे' गन्स ऑफ नेवेरॉन' द ग्रेट एक्सकेप'' ऑपरेशन डेब्रेक' 'समर ऑफ फोर्टी टू'' बेनहर' 'सायको'असे कितीतरी गाजलेले चित्रपट त्या दोघांनी मिळून पाहिले. एके दिवशी सकाळीच दहा वाजता अनिल आला आणि चल म्हणाला. "अँड्रयू हेपबर्नचा ' वेट अनंटील डार्क' बघायला जाऊ खूप छान पिक्चर आहे". शशीचे अजून काही आवरलेले नव्हते. अनिलने त्याला पटापटा आवरायला लावून मॉर्निंग शो ला घेऊन गेला. शशीच्या घरात त्याचे वडील त्यावेळी त्याला काही बोलले नाहीत. पण त्यांना हे वारंवार सिनेमाला जाणे, कादंबऱ्या वाचणे आवडत नव्हते. एके दिवशी शशीला वडिलांनी रागातच विचारले, सिनेमा कादंबऱ्या यातच वेळ घालवणार आहेस काय? शाळा अभ्यास इकडे जरा लक्ष दे. तो काय मोठ्या घरातला आहे, त्याला त्याच्या घरचा धंदा आहे. तुला नोकरीशिवाय पर्याय नाही, अभ्यासाकडे लक्ष दे. आजपासून त्याच्याशी मैत्री करायचं बंद कर. असली थेर करण्याची आपली ऐपत नाही. शाळेत लक्ष दे चांगले मार्क पाड. तरच तुला काही भविष्य आहे. नाहीतर बस पुणे स्टेशनवर हमाली करत. वडील रागवल्यावर शशी काहीही न बोलता गप्प बसला. त्याला वडिलांचे बोलणेही पटत होते, पण अनिलची मैत्री त्याला सोडवत नव्हती, अनिल तसे काही वाईट सांगत नव्हता, उलट त्याने त्याला शाळेच्या पुस्तकाबाहेरचे खूप काही शिकवले होते. त्यामुळे त्याच्या आकलनाचा, विचाराचा परीघ मोठा झाला होता. दुसऱ्या दिवशी अनिल भेटला. शशी गप्प गप्प होता. "का रे काय झाले?""काही नाही." अनिलने ओळखले काहीतरी झाले आहे. अनिलने पुन्हा पुन्हा विचारल्यावर, शशीने त्याला वडील रागावल्याचे सांगितले. अनिल थोडावेळ गंभीर झाला. आणि म्हणाला "काकांचे बरोबर आहे. तू अभ्यासाकडे लक्ष द्यायला पाहिजे. आता तुझी दहावी, पुढच्या वर्षी तू मॅट्रिकला जाणार, आत्तापासून अभ्यासात लक्ष घालायला पाहिजे. असं करू, आपण आता आठवड्यातून एकदाच भेटू" त्यानंतर दोघेही शनिवारी संध्याकाळी भेटायचे, गप्पा मारायचे. तो प्रत्येक वेळी शशीच्या अभ्यासाबद्दल विचारायचा. आता सिनेमाला जाणे जवळजवळ बंद झाले होते. एखादा चांगला पिक्चर आला तर तो त्याला फक्त सांगायचा. नंतर नंतर शशी शाळा, परीक्षा यात गुंतून गेला. अनिलही त्याच्या कॉलेजच्या मित्रांसोबत असायचा. आता त्यांची भेट कधितरीच व्हायची. कधी कधी महिनाभर एकमेकाला भेटायचे पण नाहीत. अचानक शशीच्या वडिलांची मिरजेला बदली झाली. सगळी फॅमिली घेऊन मिरजेला शिफ्ट व्हायचे ठरले. जाताना शशी अनिलला भेटायला गेला. दोघे शाहू उद्यान मध्ये बराचवेळ बसून होते. अनिल गंभीर झाला होता. एक चांगला मित्र सोडून जातोय म्हणून वाईट वाटत असल्याचे त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होते. तो अचानक उठला आणि म्हणाला "अधून मधून पुण्यात आलास तर भेटत जा." असे म्हणून त्याने त्याचा निरोप घेतला. मिरजेत गेल्यावर शशीला नवीन मित्र मिळाले. पहिल्यांदा दोन-तीनदा शशीने अनिलला पत्र पाठवले. अनिलचे त्याच्यावर उत्तर पण आले. त्यात नवीन कादंबऱ्या, पुस्तके, चित्रपट याबद्दल तो लिहायचा. त्याच्या अभ्यासाबद्दल चौकशी करायचा. नंतर नंतर पत्र पाठवणे कमी झाले. शशि नवीन मित्र, नवीनशाळा, अभ्यास यात गुंतून गेला. अकरावीला चांगले मार्क पडल्यावर विलिंग्डन कॉलेजला ऍडमिशन घेतले. मध्यंतरी अनिलचा आणि त्याचा काही संपर्क नव्हता. पुढे एफ. वाय.ला मेरिट मध्ये आला. आणि पुण्याच्या बी. जे. मेडिकलला मेरीटवर प्रवेश मिळाला. शशीला मेडिकल बरोबरच आपण पुन्हा पुण्यात जाणार याचाही खूप आनंद झाला होता. त्याने अनिलला त्याच्या घरच्या पत्त्यावर पत्र पाठवले, पण अनिलचे त्याच्यावर काही उत्तर आले नाही. पुण्यात गेल्यावर अनिलला भेटू म्हणून शशी तो विषय विसरला. पुण्यात आल्यावर ऍडमिशन, होस्टेल, इत्यादीमध्ये गुंतून गेला. नवीन कॉलेज, प्रॅक्टिकल्स, लेक्चर्स यामधून त्याला वेळ कसा जात होता हेच समजत नव्हते. या धावपळीत तो जवळजवळ अनिलला भेटायचे विसरलाच होता. एकेदिवशी रविवारी मात्र शशीने ठरवले, आज काहीही करून अनिलला भेटायचे. त्याने संध्याकाळी चारला पुणे स्टेशन बस पकडली. ससून स्टॉपवर उतरल्यावर समोरच्या बोळातल्या अनिलच्या दुकानाकडे गेला. दुकानाचे रूप पूर्णपणे पालटले होते. संपूर्ण नवीन सनमायका केलेली काचेची कपाटे, दुकानावर निऑन साईन मधला मोठा बोर्ड, मोठे काउंटर, दोन चार सेल्समन. मागच्याबाजूला एका टेबलाजवळ एक्झिक्यूटिव्ह चेअरवर एक जाडसर गोरीपान व्यक्ती बसली होती.दुकानात खूपच बदल झालेला होता. त्याने सेल्समनला विचारले "अनिल धारणे? " सेल्समन म्हणाला "काय काम आहे?"" मित्र आहे". सेल्समन म्हणाला "थांबा जरा मागे गोडाउन मध्ये माल आणायला गेला आहे. येईलच इतक्यात". पाच मिनिटात अनिल आला आणि शशीचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. अंगावर साधे कपडे, त्यावर दुकानाचा लोगो अलेले जॅकेट. हातात औषधाचा बॉक्स. अनिलचा तो अवतार पाहून शशीला काय बोलावे तेच समजेना. अनिल ने त्याला पाहिले. त्याच्या चेहऱ्यावरील हावभावात काही बदल झाला नाही.तो जवळ येऊन म्हणाला. "आता कामात आहे तुला वेळ आहे काय? मी एक तासात मोकळा होईन. तोपर्यंत तू थांबतोस का? सविस्तर बोलू." शशीने काहीच न बोलता फक्त होकारार्थी मान हलवली. अनिल म्हणाला "स्टेशनजवळच्या एसटी स्टँडवर तिकीट विंडोजवळ थांब मी आलोच." शशी ठीक आहे म्हणाला आणि तिथून बाहेर पडला. शशी कोपऱ्यावरच्या गजराज हॉटेलमध्ये गेला, दोन ग्लास पाणि पिला. चहा मागवला. चहा पिता पिता विचार करू लागला, हा स्वतः मालक असून असा का काम करतो आहे? तो खुर्चीत बसलेला कोण? त्याचे वडील कोठे आहेत? त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. तासाभराने तो स्टँड वर जाऊन थांबला. थोड्यावेळाने अनिल आला. दोघे मिळून समोरच्या हॉटेलमध्ये गेले. अनिल हसतच म्हणाला "तू कधी आलास? " शशी म्हणाला "माझं जाऊ दे, आधी मला सांग तू अशा अवतारात कसा? तुझे वडील कुठे आहेत?" अनिल म्हणाला "थांब सांगतो आधी चहा घे" निर्विकारपणे अनिल त्याला सांगू लागला, एक वर्षापूर्वी वडील अचानक हार्ट अटॅकने गेले. ते आणि त्यांच्या एका मित्राने पार्टनरशिप मध्ये होलसेल औषधांचा उद्योग सुरू केला. वडिलांचा त्यांच्या मित्रावर खूप विश्वास होता. त्यामुळे फर्म मित्राच्या नावावरच होती. व्यापारासाठी वडिलांनी दुकानावर व घरावर कर्ज काढले होते. अचानक मित्राने पार्टनरशिप तोडली. कागदोपत्री त्यांच्या नावावर काहीही नसल्याने ते काहीही करू शकले नाहीत. एकदम नुकसानीत आले, कर्ज फिटेना. त्या धक्क्याने वडील गेले. बँकेने दुकान, घर जप्तीची नोटीस काढली. वडिलांच्या ओळखीचे एक चांगले मित्र होते. त्यांनी दुकान विकत घेतले. बँकेचे कर्ज फिटले. पण घर इतर देणेकऱ्यासाठी विकावे लागले. आता अनिल वानवडीच्या पुढे एका लहानशा खोलीमध्ये भाड्याने राहत होता. अचानक झालेल्या घटनेमुळे शिक्षण अर्धवट राहिले. वडिलांच्या मित्रांनी त्याला त्यांच्याच मेडिकलमध्ये नोकरी दिली. हे सांगताना अनिलच्या चेहऱ्यावर खेद अथवा दुःख दिसत नव्हते. त्याने हा नियतीचा वार पचवला होता. आता त्याला एक अनामिक स्थितप्रज्ञता आली होती. त्याने चहाचा कप खाली ठेवला. आणि म्हणाला "ज्या दुकानात मी खुर्चीत बसत होतो, त्याच दुकानाची फरशी पुसण्याचे काम मी आज करत आहे." थोडा वेळ दोघेही आपआपल्या विचारात गुंतले. नंतर अनिल म्हणाला "माझे सोड तू कसा आहेस? " शशीला त्याला काही सांगायचा मूड राहिलेला नव्हता. त्याने थोडक्यात बी जे ला ऍडमिशन मिळाल्याचे सांगितले. अनिलने त्याचे अभिनंदन केले, पण शशीचा उत्साह पूर्णपणे संपला होता. परत भेटू म्हणून दोघेही बाहेर पडले. येता येता शशी विचार करत होता, अकल्पित अनाकलनीय अशा या सृष्टीच्या व्यवहारात आपण आपले भविष्य वाळूवर लिहिलेल्या अक्षरा सारखे कधीच लिहू नये नाहीतर नियती नावाच्या समुद्राच्या एखाद्या छोट्याशा लाटेने ते कधी व कसे नष्ट झाले हे आपल्यालाही समजून येत नाही हेच खरे, नाहीतर ज्याने आयुष्यात कधी सिटी बस ने प्रवास केला नाही, गाडी शिवाय फिरला नाही, स्वतःच्यादोन दोन बाईक होत्या त्याला आज सायकल वरून घरी जावे लागते, यापेक्षा दुर्दैव ते काय असावे. ============================= - सुरेश जमखंडे
टिप्पण्या