पैलतीर

 सखाराम भिंतीला टेकून नजर आढ्याकडे  लावून विचार करत बसला होता. काम काही नव्हतं म्हणून आढ्याकडे बघत बसला होता. कोंडाईवाडी हे गाव तसं डोंगर उतारावर वसलेल, आजूबाजूला दाट जंगल. आसपास पाच दहा किलोमीटरच्या परिसरात लहान-लहान वाड्या-वस्त्या, डोंगर उतारावरची थोडीशी शेत जमीन,  बाकी सारं जंगलावर अवलंबून, सकाळी जंगलात जाऊन जळणाच्या  चार  वाळलेल्या काटक्या, दोन-चार फांद्या तोडून मोळी करायची. जवळच्या सात मैलावरील  तालुक्याच्या गावी जाऊन मोळी विकून यायचं, चार पैसे मिळायचे. अर्धा एकर जमीन आणि त्याला लागून असलेली फॉरेस्टची एकरभर  जमीन साफ करून त्यावर भात लावण करायची, कधी मोजणी  येईल तेव्हा बघू म्हणून पिढ्यान् पिढ्या त्यावर शेती करत होते.साऱ्या  वाडीने अशीच थोडी थोडी जमीन अतिक्रमण करून घेतली होती. वाडी अगदी डोंगरउतारावर आणि चहूबाजूने जंगल असल्याने गाडी रस्ता असा नव्हताच, एक अरुंद रस्ता, धड पायवाटही नाही आणि मोठा रस्ताही नाही असा तो उतारावरून सरळ  खाली उतरत जाऊन नदीच्या खडकाळ भागातून पलीकडे जात होता. खाली तळाला वारणामाई संथ वाहत होती.आसपासच्या वाड्या-वस्त्याही  सुखा समाधानाने जगत होत्या. जादाची काही अपेक्षा नाही आणि गरजही नाही, आहे त्यात समाधानी होते. अचानक शांत पाण्यात कोणीतरी मोठा दगड टाकावा तसं घडलं. गेल्या आठ-दहा वर्षात सगळच काही बदललं, मोठे धरण बांधायला सुरुवात झाली, धरणाचे  काम जवळजवळ पूर्ण होत आले. मोजणी,  पाटबंधारे,  फॉरेस्ट खात्याचे  लोक वारंवार येऊ  लागले. दुर्बीण लावून,  टेप लावून जागा मोजु लागले. गाव पाण्याखाली जाणार म्हणून गाव उठवून पुनर्वसन करायचे निश्चित झाले. धरणाच्या कामावर वाडीतले लोक जात होते. चार पैसे मिळू लागले होते. गावाच्या पुनर्वसनाची चर्चा जोरात  चालू झाली. जिल्ह्यातील  जवळच्याच  गावात पुनर्वसनासाठी जमीन मिळाली.सरकारी  मदत मिळाली. वाडीतील जागेची मोजणी होऊन नुकसान भरपाई, नवीन घर बांधायला पैसे मिळाले. नवीन घर बांधली गेली., काहीजण तिकडे रहायलाही गेले. सखाराम आणि इतर आठ-दहा घर अजून वाडीतच वस्तीला होती. आज जाऊ उद्या जाऊ असं करत गावालाच चिटकून होती. आपली वाडी त्यांना सोडवत नव्हती. पुनर्वसन खात्याकडूनही अजून काही काम सुरू होते. धरणात पाणी साठवायला सुरुवात झाली होती. आता तालुक्याच्या,  जिल्ह्याच्या गावी जायचं झालं तर डोणीतून किंवा नावेतून पलीकड जायला लागायच. हळूहळू धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत होती. या पावसाळ्यात गाव पाण्याखाली जाणार हे स्पष्ट दिसायला लागलं होतं. मे महिना संपत आला होता. जर अचानक पावसाने सुरुवात केली तर जाणं मुश्किल होणार होतं. तलावातून जाण्यासाठी लहान-लहान दोन तीन डोणी तयार केल्या होत्या. डोणीतून एकाच वेळी  चार-पाच जण पलीकड जाऊ शकत होते. अजून सखारामच्या पुनर्वसनाच्या नवीन गावातील जमिनीच्या मंजुरीची कागदपत्र यायची यायची होती. उद्या सकाळी जिल्ह्याच्या गावी जाऊन अधिकार्‍यांची भेट घ्यायची असा विचार करून सखा रानाकडे जनावरांसाठी वैरणकाडी आणायला बाहेर पडला. संध्याकाळी अंधार पडायला आल्यावर घराकडं आला. आणलेली वैरण जनावरांच्या छपरात टाकून पुढच्या खोलीत येऊन बसला. रात्री जेवायला बसल्यावर  सखाराम बायकोला,  सावित्रीला म्हणाला" उद्या जरा  जिल्ह्याच्या गावी जाऊन कामाचं काय काय झालं ते बघून येतो" सावित्री म्हणाली" तुम्ही जाताय तर मी बी येतो. सुमी कड  जाऊन येतो."सुमी सखारामची धाकटी मेहुणी जिल्ह्याच्या गावातच बुरुड गल्लीत राहात होती." तुम्ही हापिसकड  जाऊन या तवर  मी  सुमी कड थांबतो जाताना दोन्ही पोरांना बी घेऊन जाऊ. लय दिवस झालं ती बी कुठ बाहेर गेलेल नाहीत." सखा म्हणाला," चला तर मग सगळीच जाऊ. " दोन्हीही पोरं, मोठी सायली आठ वर्षाची, आणि धाकटा मनू पाच वर्षाचा,  उद्या मावशीकडे जायला मिळणार म्हणून खूश झाली होती. सखान सगळ्यांना  सकाळी लवकर उठून आवरायला सांगितल. उद्या लवकर निघायला पाहिजे. यांना मेहुणीकड  सोडून ऑफिस सुरू व्हायच्या आत पोचलं पाहिजे म्हणजे साहेब भेटतील. असा विचार करत तो झोपी गेला. सकाळी सावित्री लवकर उठली, पहाटेच उठून तीन स्वयंपाकाला सुरुवात केली. सखा उठल्यावर चहाचं आधण ठेवून तिने पोरांना उठवले. मावशी कडे जायचं म्हणून पोरांनीहि पटापटा आवरलं आणि सगळेच लवकर न्ह्यारीला बसले. नऊ साडेनऊच्या दरम्यान बांधाबांध करून धरणाकडे  पाय वाटेने निघाले. धरणाच्या पाणलोटाच्या साठलेल्या पाण्याजवळ आले. जवळच काठावर दोन डोणी  बांधल्या होत्या. सखारामन  इकडतिकड बघितलं. जवळपास कोणीही नव्हतं. डोणी वल्हवत  पलीकड न्यायचं म्हटलं तर आणि एक गडी माणूस असता तर  लवकर पलीकडं जाता आलं असतं, पण इतक्या सकाळी येणार तरी  कोण? रात्री पाऊस झाला होता,  पाणी वाढलं होतं. पलीकडचा काठ दूर दिसत होता. काय कराव सखाला काही सूचना. कोणाची तरी वाट बघावी की परत जावं, आजचा जायचा बेत रद्द करावा, की वरच्या वाडीतील पांडबाला बोलवून आणावं? याचा विचार करु लागला. सावित्रीला त्याची अडचण लक्षात आली. आता काय करायचं तिलाही प्रश्न पडला. पोरं मावशीकड जायचं म्हणून खूष होती. अशात परत  गेलं तर ती हिरमुसणार. म्हणून ती म्हणाली, " चला मी पण हात लावते हळूहळू आपण पैलतीरी जाऊ." सखाराम म्हणाला" नको,  वाट बघू कोण येतय का ते." अर्धा तास उलटला. पण कोणीच काही यायची चिन्ह दिसनात. पोर चुळबूळ करायला लागली. सखा उठला आणि म्हणाला, " चला आपण हळूहळू जाऊ." त्यानं डोणी  सोडली. डोणीत  सगळे बसले. सख्खा हळू हळू वल्हवू लागला. तसा तो नेहमी ये-जा करत असल्याने त्याला सवय होती. पण एका वेळी दोघं तरी वल्हवायला  असायची. डोणी  सावकाश पाण्यात आत जाऊ लागली. पोर हळूच पाण्यात हात घालून एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत होती. सावित्री उगीचच त्यांच्यावर रागावल्या सारखी करत होती. सखारामला वाटलं होतं तेवढं काही वल्हवण  जड जात नव्हतं. त्यामुळे त्याच्याही मनावरचा ताण हलका झाला होता. सावित्रीला तिच्या माहेरच्या लोकांच्यावरून काहीबाही  चिडवत होता. सावित्रीने मोठ्या पिशवीतून लहान प्लास्टिकची पिशवी काढली. त्यातील चिरमुरे फरसाणा  काढून पोरांना मुठी मुठी भरून  दिला. आणि सखाच्याही हातात थोडा दिला. चिरमुरे  खात खात हसत हसत वल्हवण चालू होतं. अचानक धाकटा पोरगा" आई मला अजून चिरमुरे  दे." म्हणून जागेवरून उठला आणि त्याचा तोल गेला. तो पाण्यात पडतोय असं दिसल्यावर "अरे अरे" करत सखा  त्याला धरायला गेला आणि काही समजायच्या आतच डोणी एका बाजूला कलली. डोणीत एका बाजूने पाणी शिरले आणि एकदम पाण्यात उलटली. पालथ्या झालेल्या डोणीच्या  काठाला सखाने धरले. सावित्रीने त्याला मागून घट्ट मिठी मारली होती. सखाने धाकट्याला एक हात धरायला सांगितला दुसऱ्या हाताने बुडत्या सायलीचे केस ओढून तिला दुसरा हात धरायला सांगितला. त्या तिघांनाही पोहता येत नव्हतं. सावित्रीने  मिठी सैल केली आणि खांद्याला धरल. सखाराम डोणीच्या आधारावर तिघांनाही धरून  पाण्यात  तरंगत होता. पण तिघांच्या वजनाने डोणी  पाण्यात बुडत होती. सखाराम  जोर जोरात पाय मारून वर राहायचा प्रयत्न करत होता,  मदतीसाठी मोठ्याने ओरडत होता,.हाका मारत होता. पण जवळपास कोणीही नव्हतं. त्याने सावित्रीला खांद्याचा हात सोडून डोणीच्या काठाला धरायला सांगितलं. तिने डोणीच्या  काठाला हात धरताच , डोणी  परत  पाण्यात जास्तच बुडाली, तीन परत  सखाच्या खांद्याला हाताने धरल. आता सखाच्या  दोन्ही हाताला दोन पोर, आणि खांद्याला सावित्री यांचं ओझं जाणवत होतं. तो जीवाच्या आकांताने ओरडत होता. पण जवळपास चिटपाखरूही दिसत नव्हत. हळूहळू त्याचे पाय दमू लागले, सावित्रीला त्याची असहायता लक्षात आली होती. ती एवढी घाबरली होती की तिचा मेंदू सुन्न झाला होता. तिघांचे ओझे सखारामला जड जात होते. आता चौघेही पाण्यात बुडणार हे दिसू लागले होते. लहान दोन पोटची पोर, नवरा सगळेच  एकाच वेळी पाण्याखाली जाणार हे दिसायला लागलं होतं. ती अचानक भानावर आल्यासारखी झाली. मनाचा निर्णय झाला. आपण जर नवऱ्याला सोडलं तर ओझ कमी होईल. पोर आणि नवरा जास्तवेळ पाण्यावर राहतील. तिन सखाच्या खांद्याला घट्ट धरलेल्या आपल्या हातांकडे बघितले. दोन्ही पोरांच्याकड बघितल. सखाराम हळू हळू दमत होता, त्याला धाप लागली होती, पोर  सखाच्या दंडाला धरून रडत होती. त्यांचा केविलवाणा चेहरा पाण्यात अर्धवट दिसत होता. सखा काठाकड जाण्यासाठी प्रयत्न करत होता, पण त्याची ताकत कमी पडत होती. आता आरडाओरडा करण्याचे त्राणही त्याच्यात  शिल्लक नव्हते. पोर रडत होती, आता आपण बुडणार हे स्पष्ट दिसत होत. तो थकून थोडा थांबला, नियतीपुढे शरणागती पत्करली. अचानक त्याच्या लक्षात आलं की, पाय हलवायचे थांबवून सुद्धा डोणी  पाण्यात जास्त बुडाली नव्हती, आणि मग त्याच्या लक्षात आलं की पाठीवरचं ओझं कमी झालं आहे. त्यान मागं वळून बघितलं तर सावित्रीने खांद्यावरचे हात काढून घेतले होते आणि त्याच्या पासून थोडी तीन-चार फूट लांब गेली होती. तिचा चेहेरा पाण्याबाहेर एकदाच दिसला, तेवढ्यात तिने हात वर केला आणि म्हणाली, " धनी,  पोरांना सांभाळा" काही समजायच्या आतच ती पाण्यात दिसेनाशी झाली. सखा असहाय्यपणे तिचं जाणं पहात होता, पण तो काही करू शकत नव्हता. दोन्ही पोर मोठमोठ्याने रडत होती. सखाच्या डोळ्यातून अश्रूधारा  वाहत होत्या. तो सावित्री सावित्री म्हणून रडत  होता. पोर त्याला घट्ट धरून होती, हळूहळू आपोआपच त्याचे पाय हलत होते. किती वेळ गेला कुणास ठाऊक, काळाचे भान जणू नष्टच  झाले होते. एवढ्यात लांबवर आरडाओरडा ऐकू आला. लांबूनच लोकांचा गलका कानावर येऊ लागला. ज्यांना उलटलेली डोणी दिसली त्यांनी पळत पळत जाऊन नाव आणली. डोणी आणली, सखाला आणि दोन्ही पोरांना नावेत उचलून घेतले. काठावर आणले, सखाला काहीच समजत नव्हतं. तो काठावर बसून ढसाढसा रडत होता. त्याच्या कानावर एकच आवाज घुमत होता, " धनी,  पोरांना सांभाळा."..             =======================  -                                                   ॲड.सुरेश जमखंडे     -                                   जयसिंगपूर                -                                    9850057127    --------------------------------------------           सुरेश जी. जमखंडे,                               29.इंदिरा हाऊसिंग सोसायटी,( पश्चिम) पोस्ट:-जयसिंगपूर. तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट