पराधीन

 कॉलेज वरून येताना पाच सहा जणांचा ग्रुप, दोघे-तिघे सायकलवर हळूहळू अर्धे-अर्धे पायडल मारत चालणाऱ्या बरोबरच दंगामस्ती करत येत होते. शशी सायकलवर होता. तेवढ्यात अचानक त्याच्या कॅरेजचा   धक्का कोणालातरी लागला आणि" यु फुल" असं रागाने म्हणाल्याचा मागून आवाज आला. शशीने झटक्यात मागे वळुन पाहीले. आणि तो पहातच राहिला. अत्यंत कळकट घाणेरडी व्यक्ती, एकावर एक चार-पाच फाटके शर्ट, त्यावर जूना फटका कोट, केस वाढलेले,  वर्षानुवर्षे तेल नसल्याने पिंजारलेले, दाढी वाढलेली, फाटकी पॅन्ट अशा अवस्थेतील ती व्यक्ती एवढे बोलून वळून चालायला पण लागली होती. तो वेडा आहे हे लक्षात येत होते. पण शशीला त्यापेक्षा तो इंग्रजीत बोलला याचे आश्चर्य वाटले होते. शशी मित्राला म्हणाला" बब्या अरे तो इंग्रजीत बोलला" बबन ने मागे वळून पाहिले आणि म्हणाला" कोलंबस" शशीला काही अर्थबोध झाला नाही. बबन म्हणाला" तो इंग्लिश एवढ फास्ट बोलतो की आपल्यालाच काय पण चांगल्या चांगल्या लोकांना पण समजत नाही.तो कायम गावभर फिरत असतो काहीतरी शोधत असल्यासारखा म्हणून त्याला आम्ही कोलंबस म्हणतो." शशीला ते वेगळं वाटलं पण गप्पांच्या ओघात तो ते  विसरून गेला. आठ-दहा दिवसांनी शशी कॉलेजला जात असताना तो वेडा समोरून येत होता. शशीने जरा लक्षपूर्वक त्याच्याकडे पाहिले. अंदाजे पन्नास-पंचावन्न वय असेल. चेहरा रापलेला, मजबूत बांधा, अंगावर कळकट कपडे, कोटाच्या दोन्ही खिशात सुरळी केलेले कागद, तो जवळ आल्यावर असह्य उग्र दर्प शशी च्या नाकात शिरला.बरेच  दिवस त्याची आंघोळ झाली नव्हती हे दिसत होते. शशीला त्या वेड्या बद्दल उगीचच उत्सुकता वाटायला लागली. एक दोघांना विचारायचा प्रयत्न केला. मित्र त्यावर हसले. एक तर म्हणाला "तुझा काय पाहुणा आहे काय? " बबन म्हणाला मिरजेत अशी अशी पाच सहा खुळी आहेत. जवळच वेड्यांचा दवाखाना आणि मिरजेत रेल्वे जंक्शन असल्याने कुठून कुठून येतात. आणि लोक त्यांना इथेच सोडून जातात. तू कशाला एवढा सिरीयस होतोस." पण शशीच्या मनातून काही तो वेडा जाईना. कधीतरी जाताना अचानक तो दिसायचा. रस्त्याच्या कडेला बसलेला, कोणी काही तरी दिलेलं  खात असायचा. तो तसा कोणाला कधी त्रास द्यायचा नाही. आपल्याच नादात असायचा. मानवी जीवनात मानवनिर्मित नियम निश्चित असतात, असे झाले तर तसे होईल, दोन गुणिले दोन चारच होतात. पण त्या अव्यक्त शक्तीचे नियम वेगळेच असतात त्याच्या हातातील जादूची काठी कधी कोणाला कोणता नियम लावेल हे सांगता येत नाही. आणि विशेष म्हणजे एकाचे आयुष्य दुसऱ्या सारखे कधीच नसते. अचानक एखाद्याचे आयुष्य चमत्कारीक होऊन जाते. तसेच काहीस  याच्या बाबतीत घडले असेल असे शशीला वाटून गेले. गावाबाहेर कॉलेज रस्त्याला एका लहानशा टेकडीवर मारुती मंदिर होते. तासगाव वेस मारुती. देऊळ मोठे होते. देवळाबाहेर पिंपळाचा पार आणि भरपूर मोकळे प्रांगण. चारी बाजूला कंपाउंड, उंचावर असल्याने आसपास मोकळी जागा. पिंपळाचा पार बांधीव होता. देवळात जास्त वर्दळ नसायची. फक्त शनिवारी गर्दी असायची. कधी कधी कॉलेज सुटल्यावर येता येता पोर पोरी  देवळात यायची, इकडे तिकडे गप्पा मारत  थोड्यावेळ बसायची,  इतर वेळी देऊळ आणि त्याचा परिसर तसा रिकामाच असायचा. एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळायची. शशी तसा पहिल्यापासून हनुमान भक्त, शनिवारी मारुतीला जायचाच तसेच कधी कधी कॉलेज वरून येता येता एकटाच देवळाकडे यायचा. एके दिवशी कॉलेज सुटल्यावर तो देवळाच्या पारावर  बसला असताना सहज त्याचे लक्ष देवळाच्या मागच्या कोपऱ्याकडे गेले. तिथे मातीत तो वेडा दोन्ही पाय पसरून बसला होता. हातातला मोठा कागद जमिनीवर पसरून मन लावून कागदावरचे बघत होता. काहीतरी बडबडत होता. शशी हळूच उठला आणि पाय न वाजवता त्याच्या मागे जाऊन उभा राहिला. त्या वेड्याच्या खांद्यावरुन तो काय बघत आहे ते शशीने डोकावून पाहिले. जीर्ण  झालेल्या डाग पडलेल्या कागदावर कसलातरी नकाशा होता. तो वेडा नकाशाकडे बघून हाताच्या बोटाने काही आकडेमोड करत होता.मधेच  स्वतःची हसत होता. शशीने बाहेर येऊन सायकल काढली आणि थोड्या अंतरावर असलेल्या शिवाजी चौकातील हॉटेल मध्ये जाऊन पाव भजी घेतली. परत येऊन त्याने हळूच तो पाव-भजी चा पुडा वेड्यासमोर ठेवला. त्यावेळी त्याने झटकन मान वर  केली. शशी कडे बघितले, त्याचा चेहरा बघून शशी घाबरून चार पावले मागे सरकला. त्या वेड्याने तो पावभजीचा पुडका उचलला आणि लांब फेकून दिला. शशीला वाटलं की आता तो         ओरडणार किंवा अंगावर धावून येणार. त्याने दोन मिनिटे शशीकडे एकटक बघितले आणि पुन्हा समोरच्या कागदात डोके खुपसले. बाहेर सायकल लावण्याच्या जागेजवळच शेवंता नावाच्या एक वयस्कर बाई नारळ,  उदबत्ती,  कापूर,  फुले ई. लहानशा बाजल्यावर ठेवून विकत बसलेल्या असायच्या. त्यांनी तो सगळा प्रकार बघितला. त्या तिथूनच ओरडल्या अरे  पोरा त्याच्या कशाला नादाला लागलायस. कुठ तरी दगड बिगड मारलं  तुला. एका शनिवारी मारुतीला गेल्यावर शेवंताबाईनी शाशी ला बोलावले. "अरे पोरा परवा  काय दिलस त्या खुळ्याला? सगळं फेकून दिलं आणि नंतर तासाभराने उठून मातीत पडलेला पुडा घेऊन त्यातलं खात होता." शशी काही न बोलता हसला आणि देवळात गेला. नेहमीप्रमाणे पारावर न बसता शेवंता बाईंकडे गेला आणि म्हणाला "मावशी तो वेडा कायम इथं असतो काय?" शेवंताबाई म्हणाल्या कुठे जातोय बाबा इथंच असतो. रात्री त्या कोपऱ्यातल्या झाडाखाली झोपतो. देवळातल्या पूजाऱ्याने लई वेळा हाकलला, पर जात नाही. कायम कायतरी बडबडत असतोय. नाहीतर कागद उघडून त्यात डोकं खुपसून बसलेला असतोय." शशी म्हणाला" कोठून आलाय काय झालं असेल त्याच्या आयुष्यात, खूप शिकलेला दिसतोय." शशी घराकडे निघाला, एवढ्यात  शेवंताबाईंनी त्याला परत  बोलवलं."हा बाबा बेळगावचा हाय. चांगला विनजिनिअर होता. खुळा झाला, गेली पाच सहा वर्ष हितच हाय. तसा त्याचा कोणाला काही त्रास नाही. पण पाप बिचाऱ्याच  कसलं आयुष्य हे,  त्याची एक लांबची संबंधित बाई गावातच इथं हाय. पण ती काय याच्याबद्दल जास्त सांगत नाही. किंवा बोलत नाही." शशीची उत्सुकता वाढली. म्हणाला," त्या बाईंची आणि माझी भेट घालून देता काय?" शेवंता बाई म्हणाल्या, "शनिवारी संध्याकाळी सातच्या दरम्यान कधीकधी त्या देवळात येतात. मी तुला लांबन  दाखवतो, पण माझं नाव सांगू नको." पुढच्या शनिवारी शशी मुद्दामून संध्याकाळी देवळात गेला. लांब अंतरावर एका दगडावर बसला. बराच वेळ झाला शेवंताबाई म्हणत होत्या तसं कोणी आल नाही. पुढचे एक-दोन शनिवार  शशी देवळात जाऊ शकला नाही. मध्येच एकदा देवळात गेल्यावर शेवंता बाईंनी त्याला बोलावले." अरे त्या बाईच्या बरोबर येणारी दुसरी बाई आली होती. दोघी मिळून देवाला यायच्या तिनं सांगितलं त्या बाईच्या मिस्टरांची बदली बेळगावला झाली आणि ते सगळे आता बेळगावला राहायला गेलेत." शशीच्या मनात आलं हा एकुलता एक दुवा पण तुटला. शशीने विचार केला जाऊ दे आपल्याला तरी काय करायचं. आपला काय संबंध म्हणून त्याने वेड्याचा विचार मनातून काढून टाकला. पण  तरीही शशीच्या डोक्यातून तो विषय जात नव्हता. असं काय घडलं असेल हा प्रश्न त्याला सारखा सतावत होता. शशीला वाटले कधीकधी आपल्याशी दुरानवयेही संबंध नसलेली एखादी व्यक्ती आपल्या समोर येते आणि आपण त्याच्यात आकस्मिकपणे गुंतून जातो. असे का होते याचे आपल्यालाच आश्चर्य वाटते. पण असल्या प्रश्नांना काहीच उत्तर नसते आणि अशा अनुत्तरीत प्रश्नांची मालिका म्हणजेच जीवन. पुढच्या शनिवारी शशी देवळातून दर्शन घेऊन बाहेर पडत होता, त्यावेळी तो वेडा कोपऱ्यात बसून हातातल्या प्लॅस्टिकच्या डब्यातील काहीतरी खात होता. शशी पाच मिनिट पाराजवळ उभा राहिला. शशीला वाटायला लागलं त्याला सरळ  जाऊन विचाराव तू असा का झालास. शशीला स्वतःवरच हसू आले. एवढं असतं तर तो वेडा झाला असता का. तेवढ्यात शेवंता मावशींनी त्याला बोलावलं. "मगाशी त्या दुसऱ्या बाई येऊन गेल्या. त्यांनी सांगितलं की बेळगावात कॅनरा बँकेत त्या बाईंच्या मिस्टरांची बदली झाली आहे. देशमुख त्यांचे नाव." शशीला एखाद्या भरकटलेल्या नावेच्या सुटलेल्या नांगराचा दोर पुन्हा हातात आल्यासारखे झाले. त्याने निश्चय केला बेळगावला जायच. त्याशिवाय आपल्याला चैन पडणार नाही.सोमवारी सकाळी तो बेळगावला निघाला. बेळगावला पोहोचल्यावर त्याने समोर असलेल्या स्टेट बँकेच्या शाखेत जाऊन कॅनरा बँकेची चौकशी केली. पुढच्याच कोपऱ्यावर कॅनरा बँक होती. तिथे जाऊन शिपायाला विचारले "मिरजेहून बदली होऊन आलेले देशमुख साहेब?" शिपाई त्याला घेऊन कॅशिअर काउंटरकडे गेला. बँकेत गर्दी होती.जाळीच्या काउंटर पलीकडे देशमुख बसले होते. वयस्कर,  टक्कल पडलेले ग्रहस्थ. शशीने त्याची ओळख सांगितली. शशीचे काका कॅनरा बँकेत सातारा शाखेत होते, त्यांची पण ओळख सांगितली.कॅशला रांग लागली होती. ते म्हणाले "आता गर्दी आहे मला काही यातून दुपारपर्यंत वेळ मिळणार नाही. तू म्हणतोस ते माझ्या मिसेसचे  माहेरचे पाहुणे आहेत. ते पण बेळगावचेच." त्यांनी एका कागदावर घरचा पत्ता लिहून दिला. आणि म्हणाले "तू घरी जा ती तुला सविस्तर सांगेल. मी तू येतोयस म्हणून फोन करतो." शशी टिळकवाडीतील दिलेल्या पत्त्यावर गेला. दारावरची बेल वाजवल्यावर एका चाळीस पंचेचाळीस वर्षांच्या बाईंनी दार  उघडले. त्याने मिरजेहून आल्याचे आणि येण्याचे कारण सांगितले. त्या म्हणाल्या" परवाच मला मिरजेहून पाटील बाईंचा फोन आला होता. तूच का तो?" त्यांनी शशीला बसायला सांगितलं. पाणी आणलं. "थांब जरा" म्हणाल्या. पाच मिनिटात चहाचा कप घेऊन आल्या,  म्हणाल्या"घे, आत्ताच मिस्टरांचा फोन आला होता."आणि त्यांनी शशीला त्या वेड्या बद्दल जे काही सांगितले त्याने शशीला विमनस्क केले. त्याच्या मनात आले की मानवी आयुष्य त्या  जगन्नियंत्यापुढे किती पराधिन आहे. जयगोंड हे मुळात अत्यंत हुशार, घरची परिस्थिती एकदम चांगली. बी.ई. झाल्यावर डायरेक्ट डेप्युटी इंजिनियर म्हणून पीडब्ल्यूडी मध्ये मुंबईला नोकरीला लागले. पगार चांगला, घरची परिस्थिती चांगली.अजय आणि अक्षय नावाची दोन मुले, मोठा अक्षय कॉलेजला शेवटच्या वर्षाला होता. धाकटा अजय दहावीला होता. मूळचे बेळगावचेच असल्याने टिळकवाडीत मोठी जागा घेऊन आपल्याला हवा तसा प्रशस्त मोठा बंगला बांधला होता. त्या सुट्टीत ते  बेळगावला आले होते. सुखी कुटुंब. कशाचीही कमतरता नाही, देवाने जणू त्यांच्यावर सुखाची बरसातच  केली होती. लक्ष्मी प्रसन्न होती. पण, हा 'पणच' मानवी आयुष्यात खूप मोठा असतो. एखादे  भलेमोठे जहाज अथांग पसरलेल्या सागरात डौलाने प्रवास करत असते पण नशीब नावाची एखादी मोठी लाट, किंवा कळिकाळासारखा पाण्यातला एखादा दिसू न शकलेला मोठा खडक क्षणात त्या  जहाजाला उलटापालट करून होत्याचे नव्हते करतो. तसा एकचं क्षण पण त्याने जयगोंडांच्या आयुष्याची अवस्था पालापाचोळ्या सारखी केली. जयगोंड यांच्या मावस भावाच्या मुलाचे पुण्याला लग्न होते. सगळ्यांनीच लग्नाला जायचे ठरले. अजयला शाळेला सुट्टी होती, मोठा अक्षय, त्या दिवशी त्याचे मित्र बेळगावला येणार होते म्हणून तो घरीच थांबला. ड्रायव्हर घेऊन स्वतःच्या कारने  तिघेही पुण्याला गेले. पुण्यातून निघायला रात्री नऊ साडेनऊ वाजले.वाटेत एका धाब्यावर जेवणासाठी थांबले. तेथून बाहेर पडल्यावर सरळ बेळगाव कडे निघाले. जयगोंड  पुढे ड्रायव्हर शेजारी बसले होते. पहाटे दोन अडीच वाजता कोल्हापूरच्या पुढे कागल जवळ ड्रायव्हरला रोड डीव्हायडर दिसला नाही की त्याच्या डोळ्यावर झोपेची झापड आली, गाडी डीव्हायडरला धडकली आणि सरळ जाऊन समोरून येणाऱ्या डंपरखाली घुसली. त्याचवेळी जयगोंड बसले होते त्या बाजूचा दरवाजा त्या धक्क्याने उघडला गेला आणि ते गाडी बाहेर फेकले गेले आणि डीव्हायडरवर जोरात आदळले. डोक्याला जबर मार बसला आणि त्यांची शुद्ध हरपली. ड्रायव्हर, सौ आणि मुलगा तिघेही  जागेवरच गेले. पुढे बरेच  दिवस जयगोंड कोमात होते. त्यांना  बेळगावहुन मुंबईला हलवले. नंतर ते शुद्धीत आले पण कोणाला ओळखण्याच्या अवस्थेत नव्हते. त्यांचा स्मृतीभ्रंश झाला होता. कधीतरी अचानक त्यांना काहीतरी आठवायचे आणि ते जोरजोरात ओरडायला  लागायचे. घरात त्यांची वयस्कर विधवा बहीण होती, ती असेपर्यंत तिने कसेतरी त्यांना सांभाळले. मोठा मुलगा अक्षय याला दिल्लीतील एका मोठ्या कंपनीत नोकरी लागली होती. त्याची बायको सधन  घराण्यातली  होती. सुनेला यांना सांभाळणे जड जाऊ लागले. यांचे असे वागणे, कधीकधी घरातून अचानक निघून जाणे, परत त्यांना शोधून आणणे, यामुळे त्या दोघांच्यात वारंवार खटके उडू लागले. एके दिवशी मुलाने त्यांना सरळ मिरजेत आणून दवाखान्यात ऍडमिट केले. थोडे दिवस तो त्यांच्या उपचारासाठी पैसे पाठवायचा. नंतर त्याने हळूहळू पैसे पाठवायचे बंद केले. त्यामुळे त्यांना दवाखान्यातून बाहेर काढले.आता ते असे फिरत असतात. नातेवाईकांनी मुलाला दोन-चार वेळा निरोप पाठवले. त्याने स्पष्ट शब्दात सांगितले की यात तुमचा काहीही संबंध नाही तुम्ही यात लक्ष घालू नका. हे सर्व  सांगताना देशमुख काकींच्या  डोळ्यात पाणी आले. थोड्यावेळाने शशी त्यांचा निरोप घेऊन बाहेर पडला. बाहेर आल्यावर त्याच्या बरोबर देशमुख काकी कंपाऊंड पर्यंत आल्या. त्याला थांबवून  त्यांनी लांबूनच कोपऱ्यावरचा मोठा तीन मजली बंगला दाखवला. "तोच जयगोंड यांचा बंगला, त्यांनी स्वतः तो बांधला होता.मुलाने सर्व विकून टाकले." काकी म्हणाल्या. शशी बंगल्या जवळ गेला त्याने लांबूनच तो पाहिला. तीन मजली प्रशस्त बंगला, समोर मोठी लॉन, मोठे कास्टिंग केलेले गेट, गेट शेजारी कंपाऊंडच्या भिंतीवर काळया ग्रॅनाईटच्या चौकोनी तुकड्यावर सोनेरी अक्षरात बंगल्याचे नाव कोरले होते." गजलक्ष्मी" आणि शशीचे डोळे पाणावले. त्याला त्या सोनेरी अक्षरांमध्ये आपण जयगोंड यांना दिलेल्या पावभजीचा पुडा दिसायला लागला..                        ----------------------------------------------                    ॲड.सुरेश जमखंडे     -                    जयसिंगपूर                -                     9850057127                      ---------------------------------------------         सुरेश जी. जमखंडे,                               29.इंदिरा हाऊसिंग सोसायटी,( पश्चिम) पोस्ट:-जयसिंगपूर. तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर.     ---------------------------------------------

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट