वरात

  नेहमीच्या सर्वसामान्य जीवनात दररोज आपण एका विशिष्ट चक्रात गुंतून गेलेलो असतो आणि त्यापलीकडेही काही जग आहे याची जाणीव नसते, पण काही कारणांनी अनाहूतपणे एक वेगळेच विश्व आपल्यासमोर उभे राहते आणि  आयुष्याबाबतच्या बेगड्या  कल्पनांना ठेच पोचते.जे आहे त्यात आपण किती सुखी आहोत याची जाणीव होऊन जाते. असेच काहीसे बबनच्या बाबतीत घडले. बबनचे काका कोल्हापूरला एका सहकारी बँकेत कामाला होते. बबन त्यावेळी मिरज कॉलेजला थर्ड इयरला होता. काकांचे बँकेतील मित्र माधव बोडके तासगाव तालुक्यातील विसापूर या गावचे, त्या वर्षीच्या मे महिन्यामध्ये त्यांचे लग्न ठरले, लग्न विसापूरलाच  होते. त्यावेळी मिरजेतील बँड खूप प्रसिद्ध होते. चाळीसगाव किंवा मिरजेचे बँड लग्नासाठी आणणे हे प्रतिष्ठेचे समजले जात असे. काकांना बोडकेनी लग्नासाठी मिरजेचा बँड ठरवायला सांगितले. काकांनी त्यांच्या ओळखीने मिरज मार्केट जवळच्या सरदार मुसाचा न्यू इंडिया बँड ठरवला. लग्न चार दिवसांनी गोरज मुहूर्तावर होते. काकांना काही त्या दिवशी सुट्टी नव्हती. लग्न संध्याकाळी सहा वीसला असल्याने सकाळी बँकेत जाऊन सर्व स्टाफ मिळून संध्याकाळी लग्नाला जाणार होते. बँडवाले मुसा यांना काकांनी सकाळी लवकर जायला सांगितल्यावर मुसा म्हणाला, आमच्याबरोबर ओळखीचे कोणी तरी पाठवा, म्हणजे तिथे गेल्यावर काही अडचण येणार नाही. बबनला मे महिन्याची सुट्टी असल्याने  लग्नाच्या आदल्या दिवशी काकांनी त्याला बोलावून विचारले की,  "बँडवाल्या बरोबर सकाळी विसापूरला जातोस काय? त्यांची आणि बोडके काकांची भेट घालून दे आम्ही नंतर येतोच आहोत, येताना आमच्याबरोबर तू परत ये." बबन तयार झाला, मार्केटमध्ये जाऊन त्याने सरदारची भेट घेतली. सरदार, अंगाने जाड जुड.उंचापुरा, केसांना मेंदी लावल्यामुळे लालभडक झालेले केस, वय अंदाजे पन्नास ते पंचावन्न वर्ष, बँड कंपनीच्या दुकानात क्लोरोनेटवर काहीतरी वाजवत होता. बबनने त्यांना उद्या त्यांच्याबरोबर येणार असल्याचे सांगितले. सरदाराने त्याला उद्या सकाळी सहाला टेम्पोने निघायचे आहे, तू इथेच ये असे सांगितले. बबन लग्नाला जायचे म्हणून चांगले कपडे घालून सकाळी सहाला दुकानाजवळ पोहोचला. दुकानाच्या दाराजवळ मोठा पॅक बॉडीचा टेम्पो उभा होता.  दोघेजण टेम्पोच्या टपावर ढोल,  ताशा,  ट्रंपेट आणि इतर बँडचे साहित्य बांधत होते. मागच्या बाजूला टेम्पोत बसायला टेम्पोच्या सीटा काढून एक जुना जमखाना अंथरला होता. तेवढ्यात सरदार आला. थोड्यावेळाने इतर सातआठजण आल्यावर सरदार बबनला म्हणाला चल पुढे बसू, बबन  ड्रायव्हर शेजारी बसला. त्याच्या शेजारी सरदार बसला. मागच्या बाजूला राहिलेले  सगळे बसले होते. सात सव्वा सातला ते मिरजेतून निघाले. टेम्पोत मागे बसलेले काहीतरी बडबड, दंगा करत होते. मधेच हसण्याचा आवाज येत होता. ड्रायव्हरच्या मागच्या झरोक्यातून बिडीच्या धुराचा वास येत होता.तिघा  चौघांनी तीनपत्त्याचा डाव टाकला होता. मधेच सरदार मागे झरोक्यात तोंड घालून मस्तपैकी हिंदीतून शिवी देऊन दंगा कमी करायला सांगत होता, पण त्यालाही त्याचा काही उपयोग होईल अशी अपेक्षा नव्हती. बबन मात्र या सगळ्या वातावरणाला पूर्णपणे नवीन होता, त्याच्यासाठी हे जगच वेगळे होते. साडे अकराच्या दरम्यान ते विसापूरला पोहोचले व  चौकशी करत लग्नघराजवळ आले. टेम्पो मांडवा जवळ येताच, बँडवाले बँडवाले म्हणून पोर ठोर ओरडत  सांगत गेली.लग्नघराच्या समोरच मोठा मांडव घातलेला होता, मांडवाच्या एका बाजूला कोपऱ्यात मोठा पलंग ठेवून त्याच्यावर गाद्या टाकून पांढराशुभ्र पलंगपोस टाकलेला होता. त्याच्या  मागच्या बाजूला पडदे सोडून सजावट केली होती. जमिनीवर मोठी तीन-चार ताडपत्री अंथरून त्यावर मोठे जमखाने अंथरलेले होते.तेव्हड्यात  नवीन सदरा, धोतर, डोक्यावर काळी टोपी अशा वेशात एक वयस्कर व्यक्ती घरातून बाहेर आली. आल्या आल्या म्हणाली "काय हे किती वेळ लवकर यायचं नाही काय?" सरदार म्हणाला "गाडी पंक्चर झाली होती."" असू दे आता चला लवकर" म्हणून हाताने खूण करून ती व्यक्ती त्यांना समोरच्या बोळात घेऊन गेली. एका पडक्या पडवी वजा जागेत त्यांची थांबण्याची व्यवस्था करण्यात आली होती. "दहा मिनिटात तयार व्हा नवऱ्या मुलाला देवाला घेऊन जायचे आहे." असं म्हणत ती व्यक्ती गडबडीने निघून गेली. सरदार तोंडातल्या तोंडात काहीतरी बडबडला, तोपर्यंत एक जण जुनी ताडपत्री घेऊन आला आणी त्याने  ती पडवीत अंथरली. तोपर्यंत टेम्पो तील सर्व सामान उतरून आणले होते. सरदार सगळ्यांना पटापटा आवरायला सांगत होता. चला चला पहिला बार लावू म्हणत सगळे मांडवात आले आणि जोर जोरात  ढोल,  ट्रंपेट वाजवायला सुरुवात केली. बँडच्या आवाजाने पोरं, वऱ्हाडी इ. मांडवात जमा झाली. तेवढ्यात नवरा मुलगा त्याचे मित्र आणि चार-पाच नवीन साड्या नेसलेल्या बायका बाहेर आल्या आणि जवळच उभ्या असलेल्या सजवलेल्या बग्गी टाईप घोडागाडीत बसले. काहीजण बग्गी सोबत चालत निघाले, पुढे बँड आणि मागे घोडागाडी असा लवाजमा देवदर्शनाला गेला. या सगळ्यात  बबनकडे कोणाचेच लक्ष नव्हते. त्यालाही काय करावं हे समजत नव्हते, ओळखीचं कोणीच नव्हतं, काकांचा मित्रच नवरदेव,  त्यांच्याशिवाय कोणाची काही माहितीही नव्हती. त्यामुळे कोणाला काय सांगायचे हा प्रश्न त्याला पडला. तेवढ्यात सकाळची वयस्कर व्यक्ती गडबडीत घरात जाताना दिसली, हा त्यांच्या जवळ गेला आणि म्हणाला "काका मी बोडके काकांच्या मित्राचा पुतण्या." पण ते एवढ्या गडबडीत होते की, बबन काय म्हणतोय ते ऐकल्या न ऐकल्यासारखे करून, हात वर केला आणि तसेच घरात  गेले. बबन इकडे तिकडे लग्न घरात फिरून आला. वरती माडीवर गेला.  तिथे एका मोठ्या पलंगावर दोन-तीन पाहुणे तक्याला टेकून बसले होते. त्यातला एकटा पेपर वाचत होता, दुसरा तस्तात  ठेवलेली सुपारी मन लावून कातरत होता,  एक अंगाने जाडजुड, मोठ्या मिशा असलेला काळासावळा पाहुणा बनियन विजारीवर तक्याला टेकून बसला होता. त्याने बबनला बघितले आणि म्हणाला "बँड बरोबर आलाय जणू?" बबन होय म्हणाला. आणि बबनने  पुढे काय सांगायच्या आतच, "एक काम कर" म्हणत त्याने खिशातून पाच रुपयांची नोट काढली, "खाली कोपऱ्यावरच्या दुकानातून अर्धा पाकीट चारमिनार घेऊन ये." बबनला काय करावं ते समजेना. काही न बोलता बबनने पैसे घेतले, खाली कोपऱ्यावरच्या   दुकानात जाऊन चारमिनारचे पाकीट घेतले, आणि त्या पाहुण्याला आणून दिले. त्या पाहुण्याने जादा काही चौकशी केली नाही. बबन पाच मिनिटे थांबला आणि परत खाली निघाला, जिना उतरता उतरता बबनच्या कानावर" हल्ली बापू बँड वाली पोर बी  कटात असत्यात." असे शब्द पडले. बबन परत पडक्या  घराकडे आला. आणि कोपऱ्यात भिंतीला टेकून बसला. तेवढ्यात सगळे बँडवाले परत आले. सरदार म्हणाला "बबनराव आता काय खरं नाय, मुलगी गावातलीच हाय. त्यामुळ ही लोक सारख आपल्याला पळवणार." तेवढ्यात दोघं-तिघं मोठी दुरडी, पातेले, बारडी घेऊन आले. ओळीने पत्रावळ्या मांडल्या. सरदार आणि बाकीची पोर  उठली. सरदार बबनला म्हणाला "भूक लागली नाही का? उठा की आता." बबन ने थोडा विचार केला. आता पलीकडे लग्न घरात काय परिस्थिती आहे हे बघण्यात अर्थ नाही.तो उठला. वाढप्यांनी पटापटा भाजी,  भाकरी, आमटी वाढली, भाताचा टोप मधे ठेवला. आणि निघून गेले. त्यातला एक जण जाताना म्हणाला, "पलीकडच्या बाजूला उकिरडा आहे,  जेवण झाल्यावर पत्रावळ्या तिकडे टाका." जेवण झाल्या झाल्या पुन्हा बँड वाजवायला बोलावण आलं, सरदार वैतागला म्हणाला "हे असं सारख सारख बोलावणारच" मग त्याने दोन तीन टीम केल्या. चार चार लोकांची एक. ढोल,  क्लोरोनेट, ट्रम्पेट ई.चार वाद्य घेऊन जायची,  एक टीम एकदा जाऊन आली  की मग दुसरी जायची. हे बघून एक कारभारी लग्न घरातून आला आणि म्हणाला "अवो एवढीच लोकं वाजवायला?" सरदार म्हणाला "मालक तुम्ही पाच पाच मिनिटाला बोलवणार, पोर दमतील, रात्री वरातीत वाजवायच हाय की नाही?" तो कारभारी काही न बोलता निघून गेला. परत सकाळी पहिल्यांदा भेटलेली वयस्कर व्यक्ती आली "अहो आम्ही तुम्हाला एवढे पैसे देणार तुम्ही नीट वाजवा की," सरदाराने सरळ मघाशी जे दुसऱ्या व्यक्तीला सांगितले तेच परत सांगितले. ते काही बोलले नाहीत. ते बोडके काकांचे वडील होते हे नंतर समजले. सरदारने  बबनकडे बघितले आणि म्हणाला" आता जर परत कचकच करायला लागले तर तुम्ही जाऊन सांगा की फक्त वरातीचे  ठरले होते तरी आम्ही वाजवतोय, नाहीतर आत्ताच आम्ही परत जातो म्हणून" पण तशी काही वेळ आली नाही, निरोप आला की चार जण उठायचे,  चार वाद्य घ्यायची,  अर्धा तास वाजवून परत यायच. तेवढ्यात बबन पुन्हा एकदा बोडके यांना भेटून काकांनी पाठवल्याचे सांगावे असा विचार करून लग्नघरात गेला. बोडके काका आत कुठेतरी होते, त्यांची भेट होईल असे काही बबनला वाटेना, सकाळी चारमिनार आणायला सांगितलेला पाहुणा मांडवाच्या कोपऱ्यात उभा राहून सिगारेट ओढत होता, त्याने लांबूनच बबनकडे  पाहिले. हा बँडवाला इकडे कशाला फिरायला लागलाय असा स्पष्ट भाव त्यांच्या नजरेत दिसत होता. त्याने मांडवाच्या कोपर्‍यात टेबल मांडणाऱ्या एका मोठ्या मुलाला बोलावले आणि बबनकडे बघत त्याच्या कानात काहीतरी सांगितले. तो पोरगा सरळ  बबनकडे आला आणि त्याला काही पाहिजे का असे विचारले, बबनने मान हलवून काही नाही असे सांगितले, त्याने बबनकडे एखाद्या संशयिताकडे बघावे तसे बघितले. आणि परत तो त्याच्या कामाला लागला. आता बबनला तिथे थांबणे काही प्रशस्त वाटेना, तो परत  पडवीत गेला. सरदार ताडपत्रीवर हात डोक्याखाली घेऊन निवांत पडला होता. बबन त्याच्या जवळच बसला, बबन ने विचारले "हे बँडचे परवडते का?" सरदार म्हणाला "जास्त काही मिळत नाही, उगीच पूर्वीपासून बँडचं नाव आहे, मला क्लोरोनेट वाजवायची आवड आणि इतर काम करून यात चार पैसे सीझनमध्ये मिळतात. बाकीच्या वाजवणाऱ्या पोरांनाही काम मिळतं म्हणून हे सगळं. एकवेळ बँडला  खूप किंमत होती, आता वरातीचे प्रमाण कमी झाले, पूर्वी बँड मध्ये वीस वीस लोक असायचे, बँडवाल्यांच्यात  स्पर्धा लागायच्या, आपल्या बँडचे नाव व्हावे म्हणून रात्रंदिवस तालमी चालायच्या, आम्ही दुकानात प्रॅक्टिस करत असलो तर बाहेर लोक ऐकायला गर्दी करून उभे रहात असत. रात्री वरातीला फक्त बँड ऐकण्यासाठी लोक गोळा होत, मग लग्न कोणाचेही असो, चांगलं वाजवलं की बक्षीस मिळायच चिरमुरे उधळले जायचे. लोकांना वाजवणाऱ्याची नाव पाठ असायची, गाण्याची फर्माईश व्हायची, खूप उत्साह वाटायचा. आता सगळ संपत आलय, आता वराती कोण काढत नाही, अशीच खेडेगावात कुठे तरी मोठी सुपारी मिळते. सरदार चांगलाच मूडमध्ये आला होता. सांगता सांगता तो उठला आणि कापडी गवसणीतून क्लोरोनेट काढले, भिंतीला टेकून डोळे अर्धवट मिटून तो क्लोरोनेट वाजवू लागला. बैजू बावरा, गुंज उठी शहनाई, नागीण, मधुमती या सिनेमातील एकेक गाण्यांच्या सुरावटीने ती पडवी भरून गेली. बबन स्तब्ध होऊन ऐकत होता, कोणत्याही वाद्याच्या साथीशिवाय सरदार  क्लोरोनेटवर सुरांचा साज चढवत होता. सरदार त्याच्या सुरांच्या जगात हरवला होता. त्याने त्या स्वर्गीय सुरांनी पडवीचे रूपांतर संगीत महालात केले होते. बराच वेळ सरदार आणि बबन त्या सुरात गुंग होऊन गेले होते. सरदारचे वाजवणे थांबल्यानंतर बबनच्या तोंडातून आपोआपच वा! वा!! असे शब्द निघाले.सरदार म्हणाला मी  क्लोरोनेट वाजवण्याच्या स्पर्धेत पहिला आलो होतो. थोर संगीतकार राम कदम ते मिरजेचेच, ते मला म्हणायचे तू मुंबईला ये मोठा होशील. मुंबईला जाणार होतो पण घरच्या परिस्थितीमुळे जमलं नाही. पुढे लग्न झालं. पोर, संसार यातच अडकलो. बबन खरोखरीच त्याची क्लोरोनेटवरील हुकुमत बघून थक्क झाला होता. एखादे मौल्यवान रत्न योग्य ते कोंदण न मिळाल्यामुळे कोपऱ्यात पडल्यासारखे बबनला  वाटले. सरदार पुढे म्हणाला "आता असली गाणी वरातीत चालत नाहीत. सगळी उडत्या चालीची गाणी लागतात. वाजवायला मन होत नाही पण काय करायचं पापी पेट का सवाल." असं म्हणून हसला. बबन थोडावेळ त्याच्याच विचारात हरवून गेला, कधी स्वप्नातही विचार केला नसेल अशी ही वेगळी माणसं आज त्याला पाहायला मिळाली. केवळ संधी नाही म्हणून आणि परिस्थितीमुळे एखाद्याचे पंख अकाली छाटले जावेत त्यांना संधी मिळू नये, ही बाब त्याला खूपच अस्वस्थ करून गेली. संध्याकाळी बबनचे काका आणि त्यांचे बँकेतील मित्र आले. काकांना बोडके आणि त्याची भेट झाली नाही हे समजल्यावर त्याला घेऊन बोडके काकांच्या कडे गेले, ओळख करून दिल्यावर बोडके काकांनी जवळच उभ्या असलेल्या एका तरुण मुलाला बोलावून बबनला सांगितले हा माझा लहान भाऊ श्रीधर, आणि श्रीधरला बबनची ओळख करून दिली. श्रीधर दुसरा तिसरा कोणी नसून दुपारी त्याला मांडवात काय पाहिजे म्हणून विचारणाराच होता. श्रीधरचा चेहरा आता बघण्यासारखा झाला होता. लग्न लागले, जेवण होईपर्यंत बबन काकांच्या बरोबरच होता. काकांच्या बरोबर परत जायचे  म्हणून बबन आणि काका सरदाराला भेटायला पडवीत आले. पडवीत आल्याआल्या बबनचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसेना, लाल झगमगणारे जाकीट, डोक्यावर लाल पिकॅप, कॅपला आणि खांद्यावर सोनेरी झुरमुळ्या, पांढऱ्या शुभ्र पॅन्ट, गुडघ्यापर्यंत असलेले काळे लेदरचे टाईट गम बूट., अशा पेहरावात सगळे तयार झाले होते. त्या कपड्यांनी एकदमच सर्वांचा नूर  बदलला होता. हीच का ती सकाळची दंगामस्ती करणारी पोर?, असा प्रश्न बबनला क्षणभर पडला. आता ते त्यांच्या मुख्य कामाला तयार झाले होते. नाटक कंपनीमध्ये सकाळी काळासावळ्या, बिड्या ओढत बसलेल्या बारीक अंगकाठीचा माणसाला रात्री स्टेजच्या स्पॉट लाईट मध्ये अचानक राजाच्या ड्रेस मध्ये राजाच्या भूमिकेत पाहिल्यावर जे काही वाटेल तसेच काहीसे बबनला वाटले. आणि त्या सगळ्यांच्याबद्दल मनात काही वेगळीच भावना दाटून आली. काकांनी सरदारला ते आणि बबन परत निघाल्याचे सांगितले. सरदार  म्हणाला "साहेब नको, तुम्ही वरातीला थांबा. या लोकांनी दिवसभर आम्हाला पळवल आहे, रात्री पण काहीतरी कचकच करतील. त्यापेक्षा तुम्ही थांबा नाहीतर उगीचच वादावादी होईल." काका म्हणाले "असं काही होणार नाही, पाहिजे तर मी पुन्हा एकदा बोडकेला सांगून जातो." सरदार काही ऐकायला तयार नव्हता, शेवटी म्हणाला "निदान बबनरावांना तरी आमच्या बरोबर  ठेवा." काकांनी बबनकडे पाहिले, बबन काही आढेवेढे न घेता तयार झाला. त्याला आता या सगळ्यांच्या बद्दल एक वेगळेच आकर्षण निर्माण झाले होते. काका त्यांच्या मित्रांबरोबर निघून गेले. तिकडे बँडपथकाची जोरदार तयारी चालू झाली होती. टेम्पोच्या कॅरेजवर बांधून ठेवलेला लहानसा गाडा खाली उतरवला गेला, त्यावर मोठ्या बॅटऱ्या ठेवल्या, गाड्याला चारी बाजूंनी झालर लावली. त्यावर बँड पथकाचे नाव चमकत होतं. दोन मोठे स्पीकर लावले आणि दहा-बारा जण आपापली वाद्य घेऊन मांडवात आले. अर्धा तास वेगवेगळ्या गाण्यांच्या सुरवटीने मांडव भरून गेला. रात्री साडेदहाला वरात निघणार म्हणून निरोप आला. परत सगळे पडवीत आले. तेवढ्यात लग्नघरातून दोघे-तिघे आले, येताना त्यांनी दोन मोठ्या बाटल्या आणि चार ग्लास आणले होते. सोबत चिरमुरे फारसण्याचे पुडे होते.सरदार काही बोलला नाही. बाकी तिघे चौघे होते त्यांनी बैठक मारली. बाटल्या घेऊन येणारा म्हणाला "थोड्या वेळात जेवण येईल, आज वरातीत जोरात दणका उठला पाहिजे, आणि काय पाहिजे असलं तर सांगा, सगळी सोय करतो, गावात वरात गाजली पाहिजे." रात्री साडेदहा म्हणत म्हणत प्रत्यक्षात साडेअकराला वरातीला सुरुवात झाली. पुढे डोक्यावर गॅसबत्त्या घेतलेले आठ दहा लोक, फटाके वाजवणारी पोर, मधे बँड पथक, आणि मागे सजवलेल्या गाडीत नवरा नवरी. अशा लवाजम्यासह वरात निघाली. बबनही वराती बरोबरच होता. पथकातल्या राजू नावाच्या पोराने माईक घेतला होता आणि तो बँडच्या साथीने माईकवर  गाऊ लागला. तो एकटाच पुरुष आणि स्त्री चा आवाज काढून गाण म्हणत होता. त्याचा आवाज ऐकून बबन थक्क झाला. राजू चे गाणे झाले की सरदार क्लोरोनेटवर दुसरे गाणे वाजवायचा, या दोघांना बाकीच्यांची सुंदर साथ होती. त्यांच्या गाण्याने बघणारे आपोआपच ताल धरत होते. मिरजेचे बँड का प्रसिद्ध आहेत ते जमलेल्या गर्दीवरून समजत होते. बँडच्या बरोबर मधल्या ओळीत, त्यांच्यातील नाना नावाचा वयस्कर माणूस सर्वात मोठा ट्रंपेट ज्याला  भोपू म्हणत ते वाजवत होता. त्याने भोपू वाजवायला सुरुवात केली की सगळे बँडवाले आपल्या आपल्यात हसायचे. बबनला काही समजत नव्हते, बबनच्या जवळच त्रिकोनी  सळी असलेले वाद्य घेऊन वसंत  चालला होता, त्याने हळूच बबनला नानांच्या पायाकडे बघायला सांगितले. मग बबनच्या लक्षात खरा प्रकार आला, जेंव्हा जेंव्हा नाना भोपू वाजवायचे तेव्हा ते जागेवरच परेड करायचे, अगदी गुडघे वरपर्यंत घेऊन. नाना जागेवर परेड  करायला लागले की सगळे हसायचे.नाना सगळ्यांना हसवायचे  पण त्यांच्या आयुष्याचा सूर आणि ताल दोन्हीही हरवले होते. एक मुलगा होता तो काहीही काम करायचा नाही,दारूमुळे पूर्णपणे वाया गेला होता. नानांची  बायको कायम आजारी असायची, नाना कसेतरी संसाराचा गाडा ओढत होते.  वरात चांगलीच रंगात आली होती. प्रत्येक चौकात वरात थांबायची, नवरा-नवरीला दूध किंवा कोल्ड्रिंक दिले जायचे, चौकात एक दोन गाणी व्हायची, मगच वरात पुढे निघायची. सरदार मध्ये मध्ये येऊन बबनला लवकर आवरायला सांगा असे सांगायचा. पण बबन तरी कोणाला सांगणार?, त्यात नवरा नवरी एकाच गावचे, गावातल्या जवळजवळ सर्व गल्ल्यांमधून वरात जात होती. वेळ होत होता तसे वाजवणारे कंटाळून गेले होते पण ते नाईलाजाने वाजवत होते. वराती बरोबर असलेले पाहुणे पण चालून चालून कंटाळले होते. सुरुवातीचा उत्साह आता राहिला  नव्हता. वरात  गावात फिरून परत येईपर्यंत पहाटेचे पाच वाजले. आल्या-आल्या सरदार बबनला म्हणाला, " आम्ही लगेच जाणारा आहोत म्हणून जाऊन सांगा." बबनने बोडकेच्या वडिलांना लगेच जाणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले "लगेच कशाला जाता, आत्ता नाश्ता पाठवतो दुपारी जेवण वगैरे करून निघा." बबन परत आला. सरदार म्हणाला "नको,  तुम्हाला माहित नाही हे असं म्हणतील आणि आज पुन्हा दिवसभर देवाला जायचेय, आहेर पाठवायचाय,असली काहीतरी कारण सांगून वाजवायला लावतील." चला म्हणत सरदार आणि बबन पुन्हा बोडके काकांच्या   वडिलांकडे आले आणि सरदारने आज मिरजेला कार्यक्रम असल्याचे सांगितले. मग ते काही बोलले नाहीत आत जाऊन पानसुपारी आणि पैसे घेऊन आले. सरदार आणि बाकीचे साथीदार टेम्पोवर  सामान बांधायला लागले. बोडके काकांचे वडील परत आले आणि त्यांनी बबनला बाजूला बोलावले, आणि म्हणाले" काल आमच्या कडून जरा  चूकच झाली, आम्ही तुम्हालापण बँडवालेच समजलो." बबन म्हणाला "काही नाही हो त्यात काय एवढं" आणि मनातल्या मनात म्हणाला, एक दिवस का असेना स्वरांच्या दुनियेतील शापित गंधर्वांच्या सहवासात रहायला मिळाले हा तर माझा मोठा  बहुमानच होता...                                           

======================    -                   ॲड.सुरेश जमखंडे     -                    जयसिंगपूर                -                     9850057127    ---------------------------------------------     सुरेश जी. जमखंडे,                               29.इंदिरा हाऊसिंग सोसायटी,( पश्चिम) पोस्ट:-जयसिंगपूर. तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर.     ---------------------------------------------

टिप्पण्या

Avisagare म्हणाले…
"वरात"मनापासून आवडली ही सत्यकथा.खूपच सुंदर लिहिली आहे कथा. वाचताना माझ्याही डोळ्यासमोरुन पूर्वीच्या गांवच्या या बघितलेल्या लग्नाच्या गोष्टी फेर धरु लागल्या.मी ही त्या विश्वात गेलो आणि मन आनंदाने न्हावून गेले.आपले लेखनावर प्रभुत्व आहे. कथेचा शेवट तर फारच सुंदर केला आहे.सुंदर!!

लोकप्रिय पोस्ट