फरिश्ता
संध्याकाळी आठ साडे आठ ची वेळ. नेहमीप्रमाणे गोकुळ समोरून येत असताना शौकत समोर आला. "काय रे? घरी चाललास काय?" "नाही नाही, बागेत फिरायला चाललोय, काय लेका यावेळी घरी जाणार नाही तर कुठे?" मी. याप्रमाणे नेहमीची जुगलबंदी झाली. अचानक मला आठवले की पार्वतीला 'रेड सन' सिनेमा लागलाय. "आता काय करणार आहेस? " मी विचारले." तसं काही विशेष नाही." "चल येतोस, पार्वतीला ब्रॉन्सनचा रेड सन सिनेमा लागलाय?"" पण मला एका ठिकाणी निरोप द्यायचा आहे." असे तो म्हणाला, पुन्हा विचार करून म्हणाला." असं कर तू येथेच थांब मी आत्ता येतो निरोप देऊन."" लगेच ये."" हे बघ आलोच दहा मिनिटात." असे म्हणून त्याने लुना स्टार्ट केली. स्टेशनजवळच्या सोळंकी कोल्ड्रिंक्स जवळ मी त्याची वाट पाहत इकडे तिकडे पाहत वेळ घालवत होतो. "भाईसाब ओ भाईसाब." मागुन हाक आली. मी झटक्यात मागे वळुन पाहीले, एक 45 ते 50 पर्यंत वय असलेला अंगात जुना शर्ट व पॅन्ट, डोळ्याला रात्रीच्या वेळीही गॉगल आणि हातात पांढरी काठी व त्या काठीचा पुढचा वितभर भाग लाल रंगाचा, खांद्याला एक शबनम पिशवी अडकवलेला असा एक गृहस्त उभा होता. हा आंधळा आहे हे लगेच लक्षात आले. "क्या है?" मी. "भाईसाब ये सामनेका रेल्वे स्टेशन है ना?"" हां"" मेरा एक काम करोगे क्या मुझे रास्तेके उसका तरफ ले चलोगे?" मी त्याचा हात धरला आणि रस्त्यावरील ट्राफिक पहात त्याला पलीकडच्या बाजूस घेऊन चाललो." स्टेशन पर क्या काम है तुम्हारा?" मी मोडक्यातोडक्या हिंदीत विचारले. " जी बंबई जाना है."" अकेले?" माझ्या शब्दात आश्चर्य." "अरे बाबा वेळ कोणाला आहे माझ्या बरोबर यायला." तो म्हातारा चक्क मराठीत बोलला मी म्हणालो," बाबा तुम्हाला मराठी येत होते तर हिंदीत का बोललात?" "काय करणार बाबा मुंबईची सवय." तो म्हणाला. "म्हणजे तुम्ही?"" होय बाबा मी मूळचा मुंबईचाच. इकडे मुलीकडे आलो होतो."" मग तुमच्या बरोबर कोणीही आले नाही?"" नाही कोण येणार?" उदास पणे तो म्हणाला." एक मुलगा आहे त्याला आणि त्याच्या बायकोला वेळ नाही. एक मुलगी इथे कोल्हापुरात आहे तिचा नवरा तिला नीट वागवत नाही म्हणून जीव राहवत नाही म्हणून एकटाच येतो कधीतरी." मी विचारलं "पण तुम्हाला दिसत नाही, त्यात एवढ्या लांबचा प्रवास.""अरे" म्हातारा हसत म्हणाला." देवाने प्रत्येकाची सोय केलेली आहे भेटतो एखादा दयाळू तुझ्यासारखा." तेवढ्यात स्टेशनवर आम्ही आलो. "बेटा येथे तिकीटाची खिडकी कोठे आहे?" म्हातारा म्हणाला. मी माझ्या घड्याळाकडे पाहिले. पावणे नऊ झाले होते तसा पिक्चरला अजून वेळ होता तेवढ्यात तिकीट काढून देऊन यांना गाडीत बसवता येईल असा विचार करून मी म्हणालो. "बाबा तुम्हाला तिकीट काढून देतो." त्याने खिशातून पाकीट काढले. त्यातली एकुलती एक शंभर रुपयाची नोट काढून माझ्या हातात दिली." बाबा इथेच थांबा मी आत्ता आलो." असे म्हणून मी त्याला पब्लिक कॉलच्या बुथ जवळ उभे केले. व तिकीट काढण्यात गेलो. विंडोवर जास्त गर्दी नव्हती. मी दहा मिनिटात परत आलो. त्याचा हात धरला व प्लॅटफॉर्मवर घेऊन आलो. "बाबा एक विचारू समजा मी आता पैसे घेऊन गेलो असतो आणि परत आलो नसतो तर.." तो मोठ्याने हसला व म्हणाला" बेटा मला डोळे नसले तरी माझे कान खूप तिखट आहेत. त्यामुळे नुसत्या आवाजावरून माणसाची शराफत ओळखतो, तू तसे काही करणार नाहीस याची मला खात्री होती." प्लॅटफॉर्मवर गाडी उभी होती. गाडीला नेहमीप्रमाणे फुल्ल गर्दी होती एकुलता एक जनरलचा डबा तोही एकदम भरलेला. तेवढ्यात त्याच्या मागच्या डब्याकडे माझे लक्ष गेले त्यावर 'फौजियों के लिए' असे लिहिलेले होते व दरवाज्यात माझ्या वयाचा एक मिल्ट्रीमन उभा होता. मी सरळ त्याच्याकडे गेलो आणि विचारले "एक काम आहे करणार काय?"" काय?"" एक म्हातारा मनुष्य आहे आंधळा आहे एकटाच मुंबईला चाललाय, जनरल बोगीत जागा नाही तुमच्या डब्यात बसायला जागा दिली तर बर होईल, अगदी खाली बसायला जागा दिली तरी चालेल." त्याने एक मिनीट विचार केला व म्हणाला," ठीक आहे घेऊन या त्यांना." मी कोपऱ्यात उभ्या असलेल्या म्हाताऱ्याला घेऊन आलो व डब्यात बसवले. म्हातारा इतका खुश झाला होता की तो सारखा माझे आभार मानत होता. त्या मिल्ट्रीमनला म्हणाला "बघा ओ साहेब काही ओळखपाळख नाही हा पोरगा अगदी वेळेला भेटला. खरंच फरिश्ता आहे हो हा." मला उगीचच लाजल्यासारखे झाले तसे काही विशेष काम केले होते अशातला भाग नव्हता. तेवढ्यात शिट्टी झाली व गाडी सुटली. गाडी जाईपर्यंत म्हातारा माझे आभार मानतच होता. स्टेशनबाहेर आलो तर शौकत माझी वाट पाहत उभा होता. "कुठे गेला होतास? वाट पाहून परत चाललो होतो." त्याने वैतागाने विचारले. मी म्हणालो "कधी नाही ते आज एक सत्कार्य केले.चल आता." असे म्हणत मी त्याच्या लूनावर बसणार इतक्यात ओरडलो.."अरे थांब, थांब हे बघ तु जा पिक्चरला माझे महत्त्वाचे काम आहे मी येत नाही." म्हणून मी पळतच रेल्वे स्टेशनवरील रिक्षा स्टॅन्ड कडे आलो. रिक्षावाल्याला म्हणालो "हे बघ मिरजेला जायचं आहे, सह्याद्री आत्ताच सुटली आहे, मिरजेत पकडायची आहे." त्याने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले. "शंभर रुपये पडतील."" असू दे लवकर चल." मी म्हणालो. रिक्षावाल्याने वेगाने रिक्षा कोल्हापूर बाहेर काढली आम्ही मिरजेकडे निघालो.. अतिग्रे मागे टाकले आणि रिक्षा अचानक गचके देत थांबली. "काय झाले?" मी जरा रागानेच विचारले." बघतो." तो शांतपणे म्हणाला व त्याने रिक्षाची सीट बाजूला केली पंधरा-वीस मिनिटांच्या खटपटी नंतर रिक्षा पुन्हा चालू झाली. मिरज स्टेशनवर आलो. मी गडबडीत रिक्षावाल्याच्या हातात पन्नासच्या दोन नोटा कोंबल्या व उतरलो. बाहेर एक दोन लोक उभे होते. मी विचारले" सह्याद्री?" "जा जा लवकर जा आत्ता सुटेलच". त्यातला एक म्हणाला. मी पळत प्लॅटफॉर्मवर आलो. तोपर्यंत मागून कोणीतरी म्हणाला "ओ पळा गाडी सुटली." मी पळतच दादऱ्याचे जिने चढलो. पाच नंबर प्लॅटफॉर्म जवळ आलो पहातो तो सह्याद्री एक्सप्रेसच्या शेवटच्या डब्याने प्लॅटफॉर्म सोडला होता. मी स्तब्ध तसाच उभा राहिलो. शेवटच्या डब्याचा लाल दिवा लांब लांब जात होता, त्या म्हातारबाबांसाठी काढलेले मुंबईचे तिकीट व सुट्टे पैसे माझ्या खिशात तसेच होते... ============================== - ॲड.सुरेश जमखंडे - जयसिंगपूर - 9850057127 ---------------------------------------------- सुरेश जी. जमखंडे, 29.इंदिरा हाऊसिंग सोसायटी,( पश्चिम) पोस्ट:-जयसिंगपूर. तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर. -------------------------------------------------------- साप्ताहिक सकाळ, 13/01/1990 मध्ये प्रसिध्द. ------------------------------------------------------
टिप्पण्या