यक्षप्रश्न

             आनंदने टॉयची गाठ नीट केली. आरशात कोटाच्या कॉलर नीट आहेत का नाही ते पुन्हा एकदा  न्याहाळून पाहिले. त्याला आरशात स्वतःची प्रतिमा पाहून आपण आपल्या आयुष्यातील अत्युच्च शिखरापर्यंत पोहोचलो याचा अभिमान वाटत होता. थोड्याच वेळात तो बाहेर पडला. शोफर कारचा दरवाजा उघडून वाट पाहत होता. आज जयंतीभाईंनी सकाळी सकाळी कॉल केला होता. नवीन टेंडर दाखल करायचे होते. कोणत्याही परिस्थितीत हे मशीन पार्ट बनवायचे कॉन्ट्रॅक्ट हातून जाऊन द्यायचे नव्हते. बाफना ची कंपनी स्पर्धेत होती,  त्यांनी मध्येच काहीतरी गडबड करून कॉन्ट्रॅक्ट मिळवू नये म्हणून तो लक्ष ठेवून होता.                                                   ज्याच्या मनात गरुडाच्या पंखाचे बळ आहे तो कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही परिस्थितीत उंच भरारी मारु शकतो हे आनंदाने आपल्या स्वकर्तृत्वानं सिद्ध केले होते. तो आज जयंतीलाल यांच्या अग्रवाल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मध्ये सिनियर मॅनेजरच्या पोस्ट वर होता. कंपनीचे तसे निरनिराळे व्यवसाय होते. ऑटोमोबाईल पार्ट चे उत्पादन हा त्यांचा प्रमुख व्यवसाय होता त्याची फॅक्टरी  पुण्यात होती. वाहतुकीचे स्वतंत्र डिव्हिजन होते. मोठमोठ्या बांधकामांसाठी जेसीबी,शॉवेल्स, रोलर्स पुरवणे,  बोअरवेल मशीन साठी लागणाऱ्या पार्टसचे उत्पादन इत्यादी अनेक व्यवसाय होते. कंपनीचा विस्तार आखाती देशा पर्यंत पसरला होता. आनंद आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि कष्टाच्या जोरावर आत्ताच्या पोस्टवर पोहोचला होता. तो मालकांच्या अत्यंत विश्वासू व्यक्तींपैकी एक होता.ऑफिसला पोहोचल्यावर गेल्यागेल्या त्याने बेल दाबून जयरामला बोलावले. जयराम आत आला त्याने कोपऱ्यातील छोट्या कॅबिनेटमधील डबा काढला आणि उघडून आनंद समोर ठेवला. आनंदाची एक आवड म्हणा किंवा व्यसन त्याला ऑफिसमध्ये असताना सारखा मावा खायची  सवय होती,  आणि तेही बाळू पानवाला      याच्याकडचाच, खास त्याच्यासाठी तयार केलेला. आणि ते काम जयरामकडे असायचे, कोणालाही न समजता जयराम दररोज मावा आणून डब्यात ठेवायचा. ऑफिसमध्ये बाकीच्यांना अप्रत्यक्षपणे त्याची कल्पना असावी, पण त्याबद्दल कोणी बोलत नसत. जयराम हा आनंदचा अत्यंत विश्वासू शिपाई होता. तसा एक मावा सोडला तर आनंदला दुसरे कोणतेही व्यसन नव्हते. जयराम आनंदची जवळ जवळ सर्वच म्हणजे ऑफिसची आणि काही खाजगी कामे असल्यास ते ही करायचा. त्या दिवशी नेहमीप्रमाणे जयरामने माव्याची पुडी काढून आनंदाच्या टेबलावर ठेवली. नेहमी तो काहीतरी बोलत असायचा पण आज अगदी गप्प गप्प होता. आनंदने जयरामकडे पाहिले, त्याचा चेहरा पडलेला होता तो कसल्यातरी विचारत होता. आनंदाने विचारले "जयराम, काय रे काय झाले?"" काही नाही! तसे काही विशेष नाही." आनंदला तो काहीतरी लपवतोय  हे लक्षात आले. पुन्हा त्याने जास्तच खोदून जयरामला विचारले.जयराम काही सांगणार तोपर्यंत इंटरकॉम वाजला. जयंतीलाल सेठ यांनी बोलावल्यामुळे आनंद त्यांच्या केबिन कडे गेला. त्यादिवशी सगळा दिवस कामाच्या गडबडीत गेला. नवीन टेंडर ऑनलाईन फाईल केले, पुन्हा संध्याकाळी जयंतीलाल यांच्याकड जाऊन टेंडर बद्दल चर्चा केली. बाहेर पडता पडता जयंतीलाल म्हणाले, आपले नवीन कन्स्ट्रक्शन युनिट पुढच्याच महिन्यात सुरू करायचे आहे. त्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टरची मिटिंग लवकरच घेऊ. आनंद परत  केबिनकडे आला. आज खूपच वेळ झालेला होता. जयरामने सुटकेस गाडीत ठेवलेली होती. आनंद घरी जायला निघाला, गाडीत बसल्यावर त्याला एकदम आठवले की आज जयरामचे काहीतरी बिनसले होते. तो काहीतरी सांगत होता पण विषय अर्धवटच राहिला, उद्या गेल्या गेल्या काय प्रॉब्लेम आहे ते पाहू. दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेल्या गेल्या त्याने जयरामला विचारले. "अरे,  काल आपला विषय अर्धवटच राहिला काही प्रॉब्लेम आहे काय?"" काही नाही साहेब जरा अडचणीत आहे."" पैसे पाहिजेत काय?" आनंद. " नाही,  तस काही नाही अडचण जरा वेगळीच आहे."जयराम म्हणाला." मी पाचगावला घर  बांधतो आहे हे  तुम्हाला माहीतच आहे. कॉन्ट्रॅक्टर खूप दमवायला  लागलाय, ॲडव्हान्स घेतलेला आहे पण काम प्लिंथ पर्यंतच  झालेल आहे. मध्ये आठ दहा दिवस काम बंद होते. काल आला आणि म्हणायला लागला कामगारांनी ॲडव्हान्स पैसे उचलले आणि ते गावाकडे गेले आहेत, परत  कधी येतील सांगता येत नाही. दुसरे कामगार लावणार आहे, आणि थोडे ॲडव्हान्स पाहिजे. साहेब मला काय समजना काम तर नाही दिलेले पैसे तिकडच, आता जादा पैसे कसे द्यायचे?" आनंद म्हणाला कॉन्ट्रॅक्टर चाप्टर दिसतोय."" नाही हो,  तसा वाटत नाही, पोरगाच आहे आत्ताच काम चालू केले आहे. डिझाईन खूप भारी केले आहे. जरा स्वस्तात करतो म्हणाला. म्हणून नवीन असून त्याला काम दिलं. पण आता तो नुसताच पैसे मागतो." तेवढ्यात जयंतीलाल चा फोन आला आणि आनंद फोनवर बोलण्यात गुंतून गेला. संध्याकाळी जरा मोकळा झाल्यावर जयरामला  त्याने बोलावले. आणि सांगितले की त्या कॉन्ट्रॅक्टरला जाऊन सांग की त्यानी बांधकामासाठी बँकेचे लोन घेतले आहे. बांधकाम बघून बँक पुढचे पैसे देणार,  आता  लिंटल  पर्यंतच्या कामाचे पैसे दिले आहेत. जोपर्यंत तेवढे काम होत नाही तोपर्यंत पुढचे पैसे मिळणार नाहीत. त्याच्याकडेही पैसे नसल्याने काम पूर्ण झाल्याशिवाय पैसे देता येणार नाहीत. जयरामचा चेहरा खुलला. त्याला आयडिया पटली. त्याने दुसऱ्या दिवशी कॉन्ट्रॅक्टरला जाऊन हेच सांगितले. कॉन्ट्रॅक्टर म्हणाला साहेबांना एकदा काम बघायला या म्हणाव, मी त्यांना काम दाखवतो आणि खर्च कसा झाला ते सांगतो. पाया जास्त खोल गेला,  तुम्ही प्लॅन पेक्षा दोन फुटांनी रुंदी वाढवायला सांगितली. त्यामुळे जादा खर्च झाला त्यात कामगारांनी आता घोळ घातला. कदाचित आपले काम बघून तरी ते पैसे देतील. जयरामची     पंचाईत झाली. मुळात कर्जच नाही तर बँकेचे साहेब कुठले येणार?. जयरामने  दुसर्‍या दिवशी आल्यावर आनंदला सर्व सांगितले. आनंद विचारात पडला. आनंद त्याला म्हणाला थोडे पैसे दे, बाहेरून व्यवस्था केली असे सांग आणि काम करून घे जा. संध्याकाळी जयराम केबिनमध्ये आला आणि आनंदला भीतभीतच म्हणाला. " एक रिक्वेस्ट आहे साहेब, तुम्हीच बँकेचे साहेब म्हणून आला तर? तुम्ही खोटं-खोटं बँकेचे साहेब म्हणून काम बघितल्याचे नाटक करायचे आणि खिडकी पर्यंत काम झाले नाही तर पैसे देणार नाही असं म्हणायचं. तुम्ही बँकेच्या मॅनेजर सारखेच  दिसताय त्याला काय समजतय." आनंद खो खो हसत सुटला." काय रे  मला फसवाफसवी करायला सांगतोस. मी आजपर्यंत असं कधीच काही केलं नाही आणि तू हे मला करायाला सांगतोस?" तसा जयराम  आनंदच्या अगदी जवळचा होता म्हणून तो असं म्हणायचं धाडस करू शकला. जयराम  एकदम बिचकला,  सॉरी सॉरी म्हणत निघून गेला. आनंदच्या मनातून काही केल्या तो विषय जात नव्हता. विषय अगदी शुल्लक होता. जयरामकडे पैसे नव्हते असेही नव्हते. सुरुवातीपासून काटकसरी स्वभाव,  निर्व्यसनी आणि आटोपशीर राहणीमान यामुळे तसा तो पैसा बाळगून होता. पण बांधकाम व्यवसायातल्या या असल्या लोकांच्यामुळे त्याचे विनाकारण होणारे नुकसान आनंदला पटत नव्हते. कॉन्ट्रॅक्टर बरोबर भांडण काढावे तर तो काम सोडून जाणार, मग दिलेले ऍडव्हान्स पण बुडणार. जयरामचे हे म्हणणे बरोबर होते. हळूहळू आनंदला जयरामचे म्हणणे पटू लागले. काय हरकत आहे? दहा मिनिटे फक्त जाऊन यायचे. बांधकाम पाहिल्यासारखे करायचे जरा जोरात बोलायचे. त्यामुळे जयरामचा मोठा प्रश्न सुटणार होता. आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला पण जरा चाप बसेल. पुन्हा काम केल्याशिवाय पैसे मागणार नाही. संध्याकाळी आनंदने जयरामला बोलावले. "उद्या संध्याकाळी मी बँकेचा साहेब म्हणून बांधकामावर येतो. दहा-पंधरा मिनिटे थांबतो. आणि आणखी एक महत्त्वाचं, यातलं काहीही ऑफिसमधल्या कोणालाही कळता  कामा नये." जयरामचा चेहरा खूलला, तो लगेच तयार झाला. "साहेब थँक यू  खूप आभारी आहे." म्हणाला. आनंद म्हणाला" तुझ्यासाठी मला कधी नाही ते खोटं बोलायला लागत आहे." दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे जयराम अर्धा  दिवस रजा टाकून पुढे गेला. चार वाजता आनंदने  ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितले.आणि तो जयरामच्या बांधकामावर गेला. तीन खोल्यांचे छोटे बांधकाम, फक्त प्लिंथ  लेव्हल पर्यंत काम आले होते. आनंद गाडीतून उतरताच जयराम पुढे आला. त्याच्या मागोमाग एक तरुण  आला. पांढरा शर्ट, जीनची पॅन्ट, अंदाजे वय सवीस सत्तावीस असेल. जयरामने त्याची कॉन्ट्रॅक्टर म्हणून ओळख करून दिली. आनंद त्याच्याकडे पाहातच राहिला. त्याला अपेक्षा होती की कॉन्ट्रॅक्टर म्हणजे मध्यमवयीन, जराशी बेरकी व्यक्ती असेल. पण इथं तर पोरगेलसा तरुण पाहून त्याला त्याच्या स्किल बाबत शंका आली.आनंदने त्याला त्याची माहिती विचारली. तो मागच्याच वर्षी डिप्लोमा झालेला होता. दोन-तीन बंगल्यांची कामे केली होती. तसा तो त्या धंद्यात नवीनच दिसत होता. आनंदने चारी बाजूने बांधकाम फिरून पाहिले. अजून पर्यंत काम कसे काय झाले नाही? लिंटलपर्यंतचे  काम झाल्याशिवाय पुढचे पैसे मिळणार नाहीत, आठ दिवसात काम पूर्ण करा नाहीतर पुढचे पैसे सॅंक्शन करणार नाही. असे सांगून आनंद परत आला. आनंदच्या त्या भेटीचा चांगलाच परिणाम झाला. आठ दिवसात नाही तरी पंधरा दिवसात काम स्लॅब पर्यंत आले. आणि पुढे तीन-चार महिन्यात घराचे  कामच पूर्ण झाले. वास्तुशांतीचे वेळी आनंद कंपनीच्या कामासाठी दिल्लीला गेलेला असल्यामुळे वास्तुशांतीला जाऊ शकला नाही. जयराम आपल्या नवीन घरात राहायलाही गेला.                      मनुष्याचे आयुष्य कॅलीडोस्कोप सारखे असते, थोडी दिशा बदलली की त्याचे नवीन आयाम दिसायला लागतात. बघणार्‍याला ते विलोभनीय वाटतात, प्रत्यक्षात त्या व्यक्तीला या आपल्या बदललेल्या वर्तणुकीची व त्याच्या अव्यक्त परिणामांची जाणीव नसते पण कधीतरी एखादा अकल्पित धक्का त्याला खऱ्या सत्यतेची जाणीव करून देतो. आनंदच्या कंपनीने बांधकाम क्षेत्रात प्रवेश करायचे ठरवले,  त्यासाठी ग्लोबल कन्स्ट्रक्शन या नावाच्या स्थानिक  कंपनीशी भागीदारीत करार केला होता. कंपनीकडे ओपन प्लॉट शिल्लक होते. त्यावर कमर्शिअल आणि रेसिडेन्शिअल इमारती उभ्या  करायच्या असा प्लॅन होता. आनंदला प्रमोट करून असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून या कामासाठी खास नेमले. आनंदाच्या प्रामाणिकपणाचे ते बक्षीसच  होते. आनंद आता कंपनीच्या अगदी टॉप क्लास मध्ये पोचला होता. नवीन कंपनीसाठी वेगवेगळ्या पोस्टवर भरती चालू केली होती. इंजिनियर्सची जास्त गरज होती. पेपरला जाहिरात दिली होती. जवळ जवळ वीस पोस्ट भरायच्या होत्या, या करीता शंभर लोकांचे अर्ज आले होते. चीफ इंजिनियर मुजुमदार,  बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मधले किशोरभाई आणि आनंद स्वतः यांचे पॅनल करण्यात आले होते. चार दिवस मुलाखती चालू होत्या. दररोज वीस ते पंचवीस जणांची मुलाखत घेतली जात होती. एक एकाला बोलावून त्याची माहिती तपासून मुलाखत घेतली जात होती. उमेदवाराचे बांधकामातील ज्ञान आणि अनुभव यावर जास्त भर द्यायचा असे ठरले होते. त्यादिवशी सात-आठ उमेदवार झाल्यावर मुजुमदारांनी पुढच्या उमेदवाराला बोलावले. शरद रामचंद्र माने त्याचे नाव. त्याची कागदपत्रे तपासली, तो डिप्लोमा सिव्हिल होता. पाच वर्षाचा बांधकामातील अनुभव होता. मुलाखतीत त्याचे बांधकामाबाबतचे ज्ञान पाहून तो त्या पोस्टसाठी अगदी योग्य वाटत होता. आणि त्याबाबत जवळजवळ तिघांचे एकमत झाले. पण अचानक मुजुमदार म्हणाले" मिस्टर माने तुमच्या पेपर्सवरून तुम्ही तर 2018चे पासआऊट आहात असे दिसते. तुम्ही डिप्लोमा होऊन फक्त तीन वर्षे झाली आणि अर्जात  तुम्हीतर पाच वर्षाचा अनुभव लिहिलेला आहे?"" नाही सर मी  कॉलेजला असतानासुद्धा  बांधकामावर जात होतो." पण मानेच्या त्या बोलण्यावरून तो सरळ सरळ खोटं सांगत आहे हे लक्षात येत होतं.आणि माने पण थोडासा गडबडला होता. किशोरभाई नेहमीप्रमाणे त्यांच्या पद्धतीने खो खो हसत म्हणाले," अरे भाई आमाला काय तुमी येडे समजले काय?" आनंद तर प्रचंड चिडला होता. तो मानेला  म्हणाला "तुम्हाला प्रामाणिकपणा म्हणजे काय ते तरी माहित आहे का? काहीही झाले तरी खोटेपणा मला चालत नाही. विश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा, तुम्ही अनुभव नाही म्हणून लिहिले असते तरी तुमचे ज्ञान पाहून आम्ही तुम्हाला घेतले असते. तुम्ही आत्ताच आम्हाला फसवताय उद्या नोकरीत घेतल्यावर काय करणार? प्लीज गेट आऊट." माने खाली मान घालून उभा राहिला. तो अजीजीने म्हणाला "सर माझे  ऐकून तरी घ्या. माझी घरची परिस्थिती..." आनंदने त्याला पुढे काही बोलू न देता सांगितले की "या कंपनीत फक्त आम्ही प्रामाणिक आणि विश्वासू माणसं घेतो, खोटं बोलला की आम्हाला चालत नाहीत" आनंद रागाने ताडताड बोलत होता. बोलताना त्याचा आवाज वाढला होता. त्याला मानेच्या खोटेपणाचा खूप राग आला होता. मुजुमदार, किशोरभाई आनंदकडे बघत होते. मुजुमदारांनी आनंदला शांत करून मानेला जाण्यास सांगितले. माने  मान खाली घालून निघून गेला. मग पुढचे कॅंडिडेट मुलाखतीसाठी बोलावले. संध्याकाळी कंपनीतून बाहेर पडताना आनंदाची गाडी कंपनीच्या गेटजवळ आल्यावर वॉचमनने दरवाजा उघडला. गाडी बाहेर पडणार तोच कोपऱ्यातून अचानक एक तरुण पुढे आला. तो सकाळचाच माने होता. आनंदच्या कपाळावर आठ्या आल्या जरा त्रासिक आवाजातच त्याने  विचारले" काय आहे?" माने म्हणाला" काही नाही साहेब, मला तुमची नोकरी नको पण तुम्हाला काही सांगायचं आहे." आनंदने त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले." माने म्हणाला "सर  तुम्हाला आठवते?  सात-आठ महिन्यांपूर्वी तुम्ही जयराम पाटील यांच्या पाचगाव मधील बांधकामावर आला होता, बँक मॅनेजर बनून,त्यावेळी त्या कॉन्ट्रॅक्टरला काम लवकर कर नाहीतर पुढचे कर्ज मंजुर करणार नाही म्हणून सांगितले होते. तो कॉन्ट्रॅक्टर मीच होतो.." असे म्हणून माने निघून  गेला. आनंदला त्या क्षणी अपराधीपणाची जाणीव इतक्या तीव्रतेने झाली की कोणीतरी आपल्या छातीत सुरा खूपसतो आहे असे वाटले.खरेच आपण  कधीच आयुष्यात खोटं बोललो नाही अथवा वागलो नाही काय? हा यक्षप्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला..   =====================    -                   ॲड.सुरेश जमखंडे     -                    जयसिंगपूर                -                     9850057127                         ---------------------------------------------     सुरेश जी. जमखंडे,                               29.इंदिरा हाऊसिंग सोसायटी,( पश्चिम) पोस्ट:-जयसिंगपूर. तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर.     ---------------------------------------------

15/11/2020

टिप्पण्या

Kishor Kulkarni म्हणाले…
वा..!! छान कथा लिहली आहे.
Avisagare म्हणाले…
खूपच सुंदर लेख.काहींच्या भल्याकरिता खोटेपणा उपयोगी पडतो.पण तोच खोटेपणा कुणाच्या लक्षात येतो त्यावेळेस तत्वाचा बेगडीपणा उघडा पडतो.
आणि ते खोटे सारया सत्याला गुंडाळते.लेखाचे शिर्षक यक्षप्रश्न खरया अर्थाने लेखाची सम्रद्धता सार्थ ठरवते.खूपच सुंदर लेख.
Vaishali म्हणाले…
Story khupch chhan ahe. Tashi bodh kathach ahe. Likhanachi ani bhashechi shaily sudhha man mohun takate

लोकप्रिय पोस्ट